शरद पवारांची भाजपाबरोबरची युती का रखडली? अजित पवारांनी सांगितली अंदर की बात; म्हणाले…….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल ।। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाबरोबर युती करण्याकरता सातत्याने प्रयत्न केल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही खुलासा केला आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार जात होतं तेव्हा राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील व्हावं याकरता अनेक आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिलं होतं, यामध्ये रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता, असं अजित पवार म्हणाले. एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “सत्ताधारी पक्षाचा खासदार असेल तर कामं झटपट व्हायला मदत होते. हे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही पाहिलेलं आहे. ज्यावेळी उद्धवजींचं सरकार जात होतं, त्यावेळी माझे सर्व सहकारी माझ्या चेंबरमध्ये मंत्रालयात जमले. सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनी पत्र लिहून आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे, अशी मागणी केली होती. या पत्रावर जयंत पाटील, अशोक पवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तानपुरे, राजेश टोपे यांची सही होती. राजेश टोपेच तिथे पत्र घेऊन गेले होते.”

“आमच्या मतदारसंघातील कामे आता कुठे सुरू झाली, दोन वर्षे करोनाची अडचणीची गेली. ही कामं लोकांना काय सांगणार? लोक कामाकरता निवडून देतात, विकास व्हावा म्हणून निवडून देतात. आम्हाला सरकारमध्ये जायचं आहे, असं पत्रात म्हटलं होतं. यावरून प्रफुल्ल भाईंना आणि जयंत पाटलांना अमित शहांशी चर्चा करा असं सांगितलं होतं. चर्चेकरता आम्ही निघालोही होतो. पण नंतर साहेबांनी सांगितलं की तिथे जाऊ नका, इथंच फोनवरून चर्चा करा. परंतु, अमित भाई म्हणाले की असं होत नाही, सरकार बनवयाला आपण निघालो आहोत. तुमचा मागचा अनुभव चांगला नाहीय, मागे तुम्ही अनेकदा आमच्याबरोबर यायचं ठरवलं, अनेकदा तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला, तुमची भूमिका ठाम नसते. तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाही. पण साहेबांनी सांगितलं की इकडेच बोलायचं. पण शाह बोलले की मी फोनवर बोलणार नाही. फोनवर इतक्या महत्त्वाची चर्चा करायची नसते”, असं अजित पवारांनी सांगितलं. यामुळेच शरद पवारांची भाजपाबरोबरची युती होऊ शकली नाही. परिणामी राष्ट्रवादीत फूट पडली.

शरद पवारांनी प्रस्ताव ठेवला होता
२०१४ ला राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला होता. तर, २०१७ ला भाजपात येण्यासाठी प्रयत्न सुरू होते, याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, शिवसेनेला महायुतीतून बाहेर काढून राष्ट्रवादीने महायुतीत येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आमच्या वरिष्ठांनीच हा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही कधीच केंद्रातील लोकांशी बोललो नाही. फक्त वरिष्ठ आणि प्रफुल पटेल बोलायचे, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *