महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ डिसेंबर ।। उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. त्यामुळे तिकडून शीत लहरी वेगाने येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी अहिल्यानगरचा 5.6, तर पुणे शहरातील एनडीए भागाचा पारा 6.5 अंशांपर्यंत खाली आला होता.
जम्मू-काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात थंडीची लाट तीव्र आहे. या सर्व भागांत कडाक्याच्या थंडीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदिगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांत पारा 0 ते 6 अंशांवर आहे. तर, काश्मीरमध्ये उणे 5 इतके तापमान खाली गेले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्या भागातून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे. या दोन्ही वार्यांची टक्कर महाराष्ट्रात होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात 18 ते 21 डिसेंबरदरम्यान थंडीत किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मंगळवारचे किमान तापमान
अहिल्यानगर 5.6, पुणे (एनडीए 6.5, शिवाजीनगर 8), नांदेड 7.6, नाशिक 8, जळगाव 8.4, वर्धा 9.5, गोंदिया 8.2, नागपूर 8.2, धाराशिव 10.2, छत्रपती संभाजीनगर 10, परभणी 9.4, अकोला 10.5, सांगली 11.8, सातारा 9.1, सोलापूर 12.9, अमरावती 11.4, बुलडाणा 11.6, ब्रम्हपुरी 9.6, वाशिम 13.6, कोल्हापूर 14.6, मुंबई 20.