रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेलाचे अनेक फायदे आहेत. आपल्या शरीरातील विविध अवयवांवर हे तेल काम करते. आपल्या घरातील थोरामोठ्यांनी नेहमीच आपल्याला एरंडेल तेलाच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. एरंडेल वनस्पतीच्या बियांपासून हे तेल काढले जाते. या तेलाचे अनेक औषधी, औद्योगिक उपयोग आहेत. एरंडेल तेलाचे दाहकविरोधी आणि जीवाणूविरोधी फायदे आहेत. पण, त्याचा वापर औद्योगिक रसायने, औषधे आणि त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादने यांमध्येही केला जातो. जर तुम्ही दररोज एक चमचा एरंडेल तेलाचे सेवन केले, तर तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? याच विषयावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे सल्लागार फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉक्टर म्हणतात, “एरंडेल तेलात असे अनेक गुणधर्म असतात की, जे आपल्या शरीरासाठी लाभदायी आहेत. त्यासाठी एरंडाची पानेही खूप उपयुक्त आहेत. एरंडेल तेलामध्ये रेचक घटक असतात; जे जखमेवरील उपचार आणि ऊतींच्या वाढीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. जर एखाद्या ठिकाणी लालसरपणा असेल, तर एरंडेल तेलाने तोदेखील कमी होईल.”

बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास तुम्ही नियमित एक चमचा एरंडेल तेलाचे सेवन करावे. एरंडाचे तेल हे पोट फुगणे, पोटदुखी, अपचन, वायू धरणे (गॅस), बद्धकोष्ठता या सर्व समस्यांवर गुणकारी ठरते. एरंडाच्या तेलामधील गुणधर्म पचनक्रिया सुधारून, बद्धकोष्ठतेवर अचूक व रामबाण इलाज करतात. एरंडेल तेलामध्ये जीवनसत्त्व ई, प्रथिने, खनिजे आणि ओमेगा-६ व ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड घटकही आढळतात; जे मलत्यागासाठी उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे केसगळती थांबविण्यासह केसांच्या वाढीसाठीही एरंडेल तेलाचा वापर केला जातो.

एरंडेल तेलाच्या सेवनकर्त्यांनी घ्यावयाची खबरदारी
१. या तेलाच्या दीर्घकालीन वापरामुळे आतड्यांचे नुकसान होऊ शकते. एरंडेल तेलाची अॅलर्जी असणाऱ्या काही व्यक्तींना त्वचेची जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

२. गर्भवती महिलांनी एरंडेल तेलाचा अंतर्गत वापर काटेकोरपणे टाळावा. कारण- त्यामुळे गर्भाशयाच्या आकुंचनाला उत्तेजन मिळून गर्भपाताचा धोका वाढू शकतो.

परंतु, एरंडेल तेलाचा संयमाने आणि योग्यरीत्या वापर केल्यास ते एक उपयुक्त साधन ठरू शकते. असे असले तरी तो स्वयंपाकासाठी योग्य तेलाचा पर्याय नाही किंवा वैद्यकीय परिस्थितींमध्ये उपाय नाही. तुम्ही एरंडेल तेल वापरण्याचा विचार करीत असल्यास, तुमच्या विशिष्ट गरजांच्या संदर्भात त्याचे संभाव्य फायदे आणि जोखीम समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *