महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। पुणेकरांना हिंजवडी मेट्रोच्या माध्यमातून नवीन वर्षात पुण्यातून थेट हिंजवडीपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. नवीन वर्षात ही मेट्रो सुरू होणार असून, आयटीयन्स, चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर नवीन वर्षात पीएमपीच्या 1600 गाड्या वाढणार असल्याने प्रवाशांची गर्दीतून होणारी कसरत देखील कमी होणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात एक हजार 880 बस आहेत, यातील एक हजार 491 बस दररोज संचलनाकरिता मार्गावर असतात. पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि पीएमआरडीएची लोकसंख्या पाहता, त्यांच्याकरिता दररोज मार्गावर धावणाऱ्या 1491 बस या अपुऱ्या आहेत. बससाठी प्रवाशांना वेटींग करावे लागत आहे. त्यामुळे पीएमपी, दोन्ही महानगरपालिका यांच्याकडून नवीन बस खरेदीचे नियोजन आहे. यासोबतच केंद्र शासनाच्या पीएम ई ड्राईव्ह या योजनेच्या माध्यमातून एक हजार नवीन बस मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे. यामुळे नवीन वर्षात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचार्यांना दिलासा
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान काम सुरू असलेल्या पुणेरी मेट्रोचे काम निम्म्यापेक्षा अधिक पूर्ण झाले असून, मार्च 2025 अखेर येथून मेट्रो ट्रेन धावणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वैतागलेल्या कंपन्यांमधील चाकरमानी आणि आयटीयन्सला लवकरच दिलासा मिळणार आहे. हिंजवडी भागात पुण्यातील सर्वाधिक मोठे औद्योगिक आणि आयटी क्षेत्र आहे. या भागात असंख्य कर्मचारी, अधिकारी वर्ग कामानिमित्त दररोज आपल्या खासगी आणि कंपन्यांच्या वाहनाने (बस, कार) ये- जा करतात. येथील कोंडीने कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी अक्षरश: वैतागलेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने येथील नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो सुरू करण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. ते नवीन वर्षात पूर्ण होणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
…अशा वाढणार बस
पीएमपीच्या ताफ्यात नवीन वर्षात 1600 बस येणार आहेत. यातील 200 स्व:मालकीच्या सीएनजी बस दोन्ही महापालिका घेऊन देणार आहे. तर 400 सीएनजी बस पीएमपी भाडेतत्वावर घेणार असून, केंद्राच्या पीएम ई ड्राईव्ह योजनेतून एक हजार बस मिळण्याची शक्यता आहे. अशा एकूण 1600 नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात नवीन वर्षात दाखल होतील, यामुळे पुणेकर प्रवाशांची प्रवासासाठी होणारी ओढाताण काही प्रमाणात का होईना, कमी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.