महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। नव्या वर्षाची सुरूवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील भाविकांनी आज महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हजेरी लावली. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. यावेळी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
राज्यातील कोल्हापूरची अंबाबाई मंदिर, शिर्डीचे श्री साई मंदिर, मुंबईचे श्री सिद्धिविनायक मंदिर, पुण्याचे दगडूशेठ गणपती मंदिर, पंढरपुरचे श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर तसचे इतरही मंदिरांमध्ये आज भाविकांनी दर्शनासाठी सहकुटुंब हजेरी लावली आहे. त्यामुळे एकुणच भाविकांमध्ये आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून ओळख असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज (बुधवार) नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून भाविकांची श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांनी सहकुटुंब नववर्षाची सुरूवात श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाने केली. आज भाविकांनी मोठ-मोठ्या रांगा लावून आई अंबाबाईचे दर्शन घेतले. सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर येणारं वर्ष सुख समृद्धीचा आणि आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना करत हजारो भक्त आज पहाटेपासूनच अंबाबाईचे दर्शन घेत आहेत.
श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेशसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. नवरात्रोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात. सध्या वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्यातच नववर्षाच्या सुरूवातीला देवीचे दर्शन घेवून वर्षारंभाची सुरूवात भक्तीभावाने करण्याची भक्तांची इच्छा असते. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढले आहे.
मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मंदिर परिसरातील हॉटेल, भक्त निवास हाउसफुल्ल झाले आहेत. परगावाहून येणाऱ्या अंबाबाईच्या भक्तांसाठी देवस्थानकडून अन्नछत्राचीही मंदिरापासून जवळच सोय करण्यात आली आहे. भाविक याचाही लाभ घेत आहेत.