✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ मार्च २०२६ ।। मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाच्या ज्वाळांनी आता इराणमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता वाढवली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज, हवाई हल्ल्यांची भीती आणि अन्नटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे आर्त हाक दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेसाठी स्वतःला भूमिगत तळघरांमध्ये लपवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीमुळे भारतातील त्यांच्या कुटुंबीयांमध्येही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थी संघटनांच्या माहितीनुसार, इराणमधील अनेक शहरांमध्ये भारतीय विद्यार्थी सध्या अडकले आहेत. विशेषतः इस्फाहान शहरातून सर्वाधिक मदतीचे कॉल आले असून येथे जवळपास डझनभर विद्यार्थी तळघरांमध्ये आश्रय घेत असल्याचे सांगितले जाते. ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनने (AIMSA) दिलेल्या माहितीनुसार, इस्फाहानमध्ये सध्या सुमारे ३२ भारतीय वैद्यकीय विद्यार्थी आहेत. त्यांच्या वसतिगृहाजवळील ‘दरवाजे-ये शिराजी’ परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी तातडीने तळघरात हलवण्यात आले. ७ मार्चच्या रात्री आणि ८ मार्चच्या सकाळीही विद्यार्थ्यांकडून मदतीसाठी तातडीचे कॉल आल्याने परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इराणमधील कोम, कर्मन आणि शिराज या शहरांतील विद्यार्थ्यांनीही गंभीर परिस्थितीची माहिती दिली आहे. काही ठिकाणी निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. कर्मन येथे अन्नसाठा संपत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले असून शिराजमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, भारतातील विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही पालकांनी प्रताप पार्क येथे निदर्शने करत केंद्र सरकारने तातडीने विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परत आणावे, अशी मागणी केली आहे. AIMSA चे डॉ. मोहम्मद मोमीन खान यांनीही परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे.
