![]()
स्थायी समितीत स्वच्छता, आरोग्य, क्रीडा, जलनिःसारण आणि पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; नागरिककेंद्री विकासावर भर
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै २०२६ ।। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील स्वच्छता, आरोग्य, क्रीडा, जलनिःसारण, माहिती-तंत्रज्ञान, स्मशानभूमी, सार्वजनिक सुविधा आणि विविध पायाभूत विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या तातडीने सोडवून विकासकामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध निर्णय घेण्यात आले.
बैठकीत मासुळकर कॉलनी येथील महापालिकेची व्यायामशाळा सेवाशुल्क तत्त्वावर ११ महिन्यांसाठी सिंहगर्जना मित्र मंडळाकडे चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स, बॅनर आणि स्टिकर्स तयार करण्याच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा, वॉटर प्लस, सेवन स्टार रेटिंग, आरआरआर सेंटर्स, आयसीसीसी डॅशबोर्ड, नवी दिशा आणि झिरो वेस्ट स्लम मॉडेल यांसारख्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी माहितीपट तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
शहरातील मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत आणि गॅस दाहिनीच्या देखभाल व संचालनासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. वेताळनगर, विजयनगर, मोरयानगर, एम.बी. कॅम्प किवळे, नागसेननगर आणि रमाबाईनगर परिसरातील जलनिःसारण व्यवस्था सुधारण्यासाठी निविदांना मंजुरी देण्यात आली. भोसरी गावठाणातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या देखभालीसाठी महिला बचत गटांना पुढील ११ महिन्यांची मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहन ट्रॅकिंग प्रणालीला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यासही समितीने हिरवा कंदील दिला.
थेरगाव रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील उर्वरित बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. तसेच रावेत स्मशानभूमी प्रकल्पासाठी पर्यावरणीय निकषांनुसार वास्तुविशारदाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास, दर्जेदार नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरी समस्या तातडीने सोडवून विकासकामांमध्ये सातत्य राखण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”