महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। मुंबईची लाइफलाइन अशी ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनला आज म्हणजेच ३ फेब्रुवारीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतातली पहिली इलेक्ट्रिक रेल्वे ३ फेब्रुवारी १९२५ ला धावली होती. व्हिक्टोरिया टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला हे १६ किमी अंतर पार केलं होतं. या रेल्वेचं उद्घाटन तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली ऑर्म विल्सन यांनी केलं होतं. चार लाकडी डबे ते एसी लोकल असा मुंबई लोकलचा प्रवास १०० वर्षांचा झालाय. या निमित्ताने मध्य रेल्वेनं खास लोगोचं अनावरणही केलंय.
वीज पुरवठा वगळता पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे सेवेच्या विद्युतीकरणाची सगळी उपकरणं इंग्लंडच्या वेगवेगळ्या कंपन्यांकडून आय़ात केली होती. मध्य रेल्वेवर १९२५ मध्ये इलेक्ट्रिक रेल्वे धावली. तर पश्चिम रेल्वेवर १९२८ मध्ये इलेक्ट्रिक रेल्वे ट्रॅकवर आली. जगात पहिली रेल्वे सप्टेंबर १८२५ मध्ये धावली होती. तर भारतात पहिल्यांदा १६ एप्रिल १८५३ मध्ये रेल्वे धावली होती.बोरी बंदर ते ठाणे दरम्यान पहिल्या रेल्वेची ट्रायल घेण्यात आली होती. जगात पहिल्यांदा जर्मनीत पहिली इलेक्ट्रिक प्रवासी रेल्वे धावली.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात ३ फेब्रुवारी १९२५ हा दिवस मैलाचा दगड ठरला. १०० वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेनं चार डब्यांची पहिली इलेक्ट्रिक लोकल सुरू केली. १९२८ पर्यंत हार्बर मार्गावर चार डब्यांची तर मध्य रेल्वेवर ८ डब्यांची लोकल धावायची. १०० वर्षांनंतर आता ४ डब्यांची लोकल १५ डब्यांची झालीय. तर सुरुवातीला लाकडी डबे असणारी लोकल आता एसी झालीय. पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेनं तेव्हाचे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला हे १६ किमी अंतर पार केलं होतं. ताशी ५० मैल वेगानं ही रेल्वे धावली होती.
मध्य रेल्वे कंपनीचा कारभार सुरुवातीला ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेकडून चालवला जायचा. याच कंपनीने वीजेवर धावणारी ही लोकल चालवली होती. १९२५ मध्ये पहिली इलेक्ट्रिक लोकल धावल्यानंतर १९२७ पासून मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर ८ डब्यांच्या लोकल धावायला सुरुवात झाली. हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायर १५०० व्होल्टची होती. ती आता २५०००० एसी करण्यात आलीय. तर २०१६ पासून हार्बरवर १२ डब्यांची लोकल धावते.