महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल ।। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीसह राज्यात महापालिका असलेली 29 महानगरे आणि एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अन्य सहा शहरांमध्ये लवकरच ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार असून त्यासाठी ई-बाईक टॅक्सी चालक आणि प्रवाशालाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा शासन निर्णय सोमवारी जारी केला. या सेवा पुरविण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रवाशांची सुरक्षितता याबाबत नियमावली जाहीर केली आहे.
या धोरणांतर्गत ई-बाईक टॅक्सी सेवा देणार्या समुच्चयकांना इलेक्ट्रिक बाईकच वापराव्या लागणार आहेत. एका बाईकवर एकच प्रवासी एका वेळेस नेण्याची अनुमती असेल. तसेच बाईक चालकाचे किमान वय 20 ते कमाल 50 वर्षे असेल. त्यामुळे 50 वर्षांहून अधिक वयाच्या चालकांना ही बाईक टॅक्सी चालविता येणार नाही. मुख्य म्हणजे 12 वर्षांखालील प्रवासी या बाईक टॅक्सी सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही, ही अट सरकारने निश्चित केली आहे.
प्रत्येक फेरीसाठी जास्तीत जास्त 15 किमीची मर्यादा असेल. म्हणजे 15 किमीच्या पुढे प्रवास ई-बाईकला करता येणार नाही. या अंतरापेक्षा अधिक अंतरावर जायचे असेल तर प्रवाशांना शासकीय वा अन्य खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांचा अवलंब करता येईल. अंतराची ही अट टाकून खासगी टॅक्सी, ओला-उबेरसारख्या कंपन्यांत कार्यरत टॅक्सी यांनाही व्यवसाय मिळेल, याची काळजी सरकारने घेतली आहे. राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाईक) टॅक्सी समुच्चयक (अॅग्रीगेटर) सेवा सुरू करण्यास ओला-उबेर वा टॅक्सी चालवणार्यांकडून होणार्या विरोधाला न जुमानता अखेर राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अॅपच्या माध्यमातूनच सेवा घेता येणार
ई-बाईक टॅक्सी सेवेचा लाभ घेण्यासाठी ही सेवा पुरविणार्या कंपन्यांच्या अॅपद्वारेच बुकिंग करता येईल. दुचाकी टॅक्सी अॅग्रीगेटरकडे सुरक्षा मानकांची पूर्तता करणारे अॅप/संकेतस्थळ असणे आवश्यक राहील. तसेच दुचाकी-टॅक्सी सेवा या अॅप/संकेतस्थळ याद्वारे चालविण्यात येईल.
सुरक्षिततेसाठी कठोर नियम
या धोरणांतर्गत सेवा देणार्या अॅग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवासी या दोन्हींकरिता अपघाती व मृत्यू विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबातच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे.