अनलॉक ४ : १ सप्टेंबरपासून काही गोष्टी सुरु होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २४ ऑगस्ट – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता हळूहळू देशातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यातच आता देशात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ सुरू होणार असल्यामुळे या टप्प्यामध्ये केंद्राकडून अनेक गोष्टी सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.

केंद्र सरकार १ सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची घोषणा केली.

त्याचबरोबर १ सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये मेट्रो सेवा १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या काळात फक्त ५० प्रवाश्यांना मेट्रोच्या एका बोगीमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पण अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील बंद असलेल्या शाळा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. पण केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारवर सोपावला आहे. देशात मागील २४ तासांमध्ये देशात ६९ हजार २३९ नव्या रुणांची नोंद झाली असून ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३० लाख ४४ हजार ९४१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५६ हजार ७०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *