महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ एप्रिल ।। ‘‘जम्मू-काश्मीरमधील पहलगाम बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला संदेश योग्य आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीय सरकारबरोबर असले पाहिजेत. परंतु, सरकारने कोणताही निर्णय घेताना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद पवार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
पवार गुरुवारपासून (ता. २४) सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. आंबोली नांगरतास येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, ‘‘पर्यटकाला धर्म विचारून मारणे हे भयंकर कृत्य आहे. धर्म विचारून एखाद्या पुरुषाला मारणे म्हणजे परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. जे लोक धर्माबाबत अधिक बोलतात, त्यांनाच सरकार पाठिंबा देते हे योग्य नाही. सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे आणि सर्वजण सरकारबरोबर आहोत.’’
‘निर्बंध लादताना विचार करावा’
‘‘सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे आणि कोणताही निर्णय घेतल्यास तो तडीस न्यावा. केंद्राने पाकिस्तानवर काही निर्बंध लादले आहेत. परंतु, ते लादताना सरकारने थोडा विचार केला पाहिजे. भारताची विमानसेवा पाकिस्तानमधून जात असताना बंद केली, तर त्याचा परिणाम भारतावरच होईल. असे अनेक निर्णय आहेत. परंतु, यातून पाकिस्तानलाही एक संदेश जाईल,’’असे मत त्यांनी व्यक्त केले.