RTE Admission: आरटीई प्रतीक्षा यादीतील तिसरी फेरी सुरू; 2 हजार 482 विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील दुसर्‍या फेरीतील प्रवेशाची मुदत अखेर (दि. 21) संपुष्टात आली. त्यानंतर आता तिसरी फेरी सुरू करण्यात आली असून, 28 एप्रिल ते 7 मे दरम्यान संबंधित फेरी राबविण्यात यावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.

आत्तापर्यंत 86 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे आरटीईद्वारे प्रवेश निश्चित झाल्याचे आरटीई पोर्टलवरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील 8 हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 102 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 151 अर्ज दाखल झाले होते. (Latest Pune News)

प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर 10 मार्चपर्यंत 69 हजार 582 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश 18 मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यासाठी 24 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. या फेरीसाठी 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर दुसरी फेरी 8 ते 15 एप्रिलदरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या फेरीसाठी 21 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

आता 28 एप्रिल ते 7 मेदरम्यान तिसरी फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आत्तापर्यंत नियमित यादीमध्ये 69 हजार 582, पहिल्या प्रतीक्षा यादीत 12 हजार 49 तर दुसर्‍या प्रतीक्षा यादीत 4800 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नियमित आणि दोन्ही प्रतीक्षा यादी मिळून तब्बल 86 हजार 431 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर तिसर्‍या प्रतीक्षा यादीमध्ये 2 हजार 482 विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेर्‍या राबविण्यात येणार आहेत. शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास 86 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरवर्षी साधारण 82 ते 83 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया राबवण्यास जास्त वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *