महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मे ।। भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळा भीषण तापदायक राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे. विदर्भात मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही उन्हाचे जोरदार चटके जाणवले.
आतापर्यंतची आकडेवारी व इतिहास बघितल्यास, एप्रिल महिना यावर्षी सर्वाधिक उष्ण व वैदर्भीयांची अग्निपरीक्षा घेणारा ठरला. उल्लेखनीय म्हणजे, मे मध्येही तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागणार असल्याचे चंद्रपूरचे हवामान अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
काही वर्षांपासून जागतिक पातळीवरील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भातही त्याचा तीव्र प्रभाव जाणवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मार्च हा दशकातील तापदायक महिना ठरल्यानंतर हे चित्र एप्रिलमध्येही होते. या महिन्यात उन्हाने अक्षरशः कहर केला. भूतकाळात कधी नव्हे इतके चटके यावेळी जाणवले.
मधल्या काळातील दोन-चार दिवसांचा अवकाळी पावसाचा काळ वगळता यावर्षी चांगलेच ऊन तापले. एप्रिलमध्ये विदर्भातील चंद्रपूर, अकोला, ब्रह्मपुरी, अमरावती, वर्धा, नागपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ४४ च्या वर तापमानाची नोंद करण्यात आली. तर काही जिल्ह्यांचा पारा ४६ अंशाला टेकला होता. त्यामुळेच की काय यावर्षी केवळ राज्य व देशातच नव्हे, संपूर्ण जगात विदर्भातील तापमानाची जोरदार चर्चा झाली.
एप्रिलमध्ये सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली. तर नागपुरातही १९ एप्रिलला पारा उच्चांकी ४४.७ अंशापर्यंत गेला होता. उल्लेखनीय म्हणजे, ब्रह्मपुरी व अकोला येथेही जगात सर्वाधिक तापमान नोंदले गेले. विदर्भातील सर्वाधिक शहरांची प्रथमच जगातील ‘टॉप टेन हॉट’ शहरांमध्ये नोंद झाली.