![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मे ।। मुंबई (Mumbai Weather Update) आणि कोकण (Konkan) किनारपट्टी भागांमध्ये उष्मा वाढत असतानाच आता राज्यातील काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी पारा घसरताना दिसत आहे. कमाल तापमानात घट होत असून, किंचितशा ढगाळ वातावरणामुळं नागरिकांना उष्णतेपासून हवाहवासा दिलासाही मिळताना दिसत आहे. पुढच्या 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून, राज्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असून, 24 तासांनंतर मात्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राज्यातील काही भागांसाठी वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं मे महिन्याची सुरुवात आणि चालू आठवड्याचा शेवट हा पावसाच्या हजेरीनं होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळं विदर्भातून केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे. परिणामी महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येण्यास सुरुवात
वरील प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. शिवाय स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून उंचावर ढगांची निर्मिती होऊन, किमान पुढील चार दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पारवासमुळं पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नागरिकांचा गोंधळ उडू शकतो.
पावसाचा हा इशारा पाहता पुढच्या 24 तासांसाठी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा यवतमाळ इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, शनिवारसाठी भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा यवतमाळ. अमरावती अकोला वाशिम, नाशिकला यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान पूर्व विदर्भ वगळता राज्यातील इतर भाग आणि छत्रपती संभाजीनगरसह रायगड, ठाणे, पालघर इथं उष्मा कायम असेल.
राज्यात एकाएकी तापमानात घट
प्रादेशिक हवामान विभागाच्या माहिती आणि निरीक्षणानुसार उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटा कमी झाल्यास मुंबईतील तापमानातही घट होते आणि यंदा असंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच दरवर्षी मे महिन्याच्या सुमारास बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्यास पूरक वातावरणनिर्मिती होते. आणि याचा परिणाम मुंबईसह कोकण किनारपट्टी क्षेत्रांवर होताना दिसतो. राज्यात सध्या तापमान 38 ते 40 अंशांदरम्यान असतानाच ही सातत्यपूर्ण घट नागरिकांना किमान दिलासा देत आहे. सध्या अशाच वातावरणीय बदलांमुळे महाराष्ट्रात अगदी मराठवाड्यापासून मुंबईपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत सातत्यानं बदलतं हवामान पाहायला मिळत आहे.
