वाघा सीमा खुलीच राहणार; पाकिस्तानची घोषणा, नागरिकांना परत येण्याची परवानगी देण्यास तयार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। जम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी सलग आठव्या दिवशीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर आठ वेळा गोळीबार केला. त्याला भारतातर्फे चोख प्रत्युत्तर देण्यात आले. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने सीमेवर गोळीबार करीत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने व्हिसा रद्द केल्याने भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना वाघा सीमा पार करून पाकिस्तानात येण्याची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा पाकिस्तानने शुक्रवारी केली.

‘अटारी सीमेवर भारताच्या बाजूला पाकिस्तानी नागरिक अडकल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भारतीय अधिकारी या अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी देत असल्यास, आम्ही आमच्या नागरिकांना स्वीकारण्यास तयार आहोत. भविष्यात परतू इच्छिणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठीही वाघा सीमा खुली राहील,’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयावरही या प्रवक्त्याने टीका केली. ‘भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केल्यामुळे गंभीर मानवतावादी आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेकांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये व्यत्यय येत आहे; तसेच अनेक कुटुंबांना विभक्त व्हावे लागत आहे,’ असे या प्रवक्त्याने म्हटले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. यासाठी ३० एप्रिलची मुदत देण्यात आली होती. भारतातील अमृतसर आणि पाकिस्तानातील लाहोर यांच्याजवळ असलेली अटारी-वाघा सीमा ३० एप्रिलपर्यंत खुली ठेवण्यात आल्यानंतर, गुरुवारी, १ मे रोजी बंद करण्यात आली होती. भारत सोडण्याची मुदत संपल्याने गुरुवारी सीमेवर ७० पाकिस्तानी नागरिक अडकल्याचे वृत्त होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *