![]()
महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० ऑक्टोबर | दिवाळी आली, पण यंदा फुलबाज्यांपेक्षा ढगांचे फटाके आधी फुटतील असं दिसतंय! हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची टपोरी एंट्री होणार आहे. मुंबईपासून पुण्यापर्यंत, रायगड ते कोल्हापूर — सर्वत्र ढगांचा मोर्चा निघालाय!
सध्या राज्यात “ऑक्टोबर हीट”ची काहिली सुरू आहे —लोकांच्या अंगावर सूर्य भाजतोय, आणि हवामान विभाग सांगतोय, “थांबा जरा, दिवाळीत थंडावा देतो!”
IMD च्या मते, अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय, जे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढवेल.तसंच, बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ परिभ्रमण तयार होतंय —त्याचंही थेंब महाराष्ट्रावर पडणार आहेत.
🌩️ १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटी पाऊस पडणार,
तर २१-२२ ऑक्टोबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट ऐकू येणार!
रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता,
तर नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलका पाऊस —
जणू दिवाळीच्या फुलबाज्यांमध्ये निसर्गानं पाण्याचे फवारेच मिसळलेत!
हवामान खात्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी ‘पिवळा इशारा’ दिला आहे.मराठवाड्यात आकाश ढगाळ राहील, दिवसाचं तापमान कमी आणि रात्री किंचित उष्ण राहील.
आता बघा, एकीकडे लोक फुलबाज्या पेटवणार, तर वरून ढग आपले ‘वॉटर बॉम्ब’ टाकणार! म्हणजे दिवाळीत प्रकाशही असेल आणि थोडं थंडगार पावसाचं समाधानही. मग या दिवाळीत म्हणावं —“फटाके कमी, पण ढगांचे फटकारे जास्त!”
