Baba Venga Prediction : तणाव वाढता… आणि बाबा वेंगांची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०३ मार्च २०२६ ।। इराण–इस्रायल–अमेरिका या त्रिकोणात गेल्या काही दिवसांत तणाव तीव्र झाला आहे. राजनैतिक इशारे, लष्करी हालचाली आणि आक्रमक वक्तव्यांमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाण्यांची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर २०२६ मधील ‘मोठ्या जागतिक संघर्षा’बाबत त्यांनी इशारा दिला होता, असे दावे पुढे येत आहेत.

अमेरिकेकडून दिलेल्या अल्टिमेटमनंतर परिस्थिती अधिक चिघळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबतही चर्चा रंगत आहे. काही संकेतस्थळे आणि पोस्ट्समध्ये मार्च–एप्रिल २०२६ दरम्यान मोठी घडामोड घडेल, असा उल्लेख बाबा वेंगांच्या भविष्यवाणीत असल्याचा दावा केला जातो. पूर्वेकडील राष्ट्रांमधील तणाव वाढून व्यापक युद्धाचा भडका उडू शकतो, असेही काही ठिकाणी म्हटले जात आहे.

तथापि, तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांबाबत अधिकृत आणि विश्वसनीय नोंदी अत्यल्प आहेत. अनेक भाकिते नंतरच्या काळात त्यांच्या नावाशी जोडली गेल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे सध्याच्या घडामोडी आणि त्यांच्या कथित भविष्यवाण्या यामध्ये थेट संबंध जोडणे कठीण आहे. तरीही जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अशा भविष्यवाण्या पुन्हा चर्चेत येतात—आणि भीती, कुतूहल व अफवांना खतपाणी घालतात—हेही तितकेच खरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *