✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल २०२६ ।। जागतिक व्यापाराची धडधड जिथे ऐकू येते, तीच मलक्काची समुद्रधुनी सध्या तणावाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आशियाई अर्थव्यवस्थेची ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या या अरुंद मार्गावर अमेरिकेची हालचाल वाढल्याने चीनची चिंता उघडपणे समोर येऊ लागली आहे. अमेरिकेच्या सातव्या आरमारातील USS Miguel Keith या अत्याधुनिक जहाजाच्या उपस्थितीने हा भाग केवळ व्यापारी मार्ग न राहता सामरिक रणांगण बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समुद्रात फिरणारे कमांड सेंटरच जणू इथे उभे ठाकले आहे.
इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांच्या मधोमध असलेला हा समुद्री दुवा हिंद महासागर आणि प्रशांत महासागराला जोडतो. जगातील तब्बल २५ ते ४० टक्के सागरी व्यापार या मार्गावर अवलंबून आहे. दरवर्षी हजारो जहाजे आणि ट्रिलियन डॉलर्सचा व्यापार याच पट्ट्यातून होतो. पण या मार्गाची खरी ‘कमजोरी’ म्हणजे त्याची अरुंद रचना. काही ठिकाणी अवघ्या २.८ किमी रुंदी असलेला हा मार्ग अडथळ्यांसाठी अतिशय संवेदनशील आहे. म्हणूनच चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष Hu Jintao यांनी याला ‘मलक्का डिलेमा’ असे नाव दिले होते—कारण या मार्गावर कोणताही अडथळा म्हणजे थेट अर्थव्यवस्थेवर घाव.
अमेरिका इंडो-पॅसिफिकमध्ये आपली पकड मजबूत करत असताना, चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचा स्पष्ट संदेश देत आहे. अशा ‘चोकपॉइंट्स’वर उपस्थिती वाढवणे ही केवळ लष्करी हालचाल नसून रणनीतीचा भाग आहे. पण या महासत्तांच्या खेळात सर्वसामान्यांवर परिणाम होणार हेही तितकेच खरे. जर हा मार्ग बाधित झाला, तर इंधनापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व वस्तूंच्या किमती वाढू शकतात. पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर महागाईचा भडका उडणे अटळ ठरू शकते. म्हणजेच, समुद्रात चाललेला हा खेळ अखेर आपल्या खिशालाच झळ पोहोचवणार आहे.
