![]()
खराडीतील संत समागमात प्रेम, शांती, बंधुभावाचा जागर; राकेश मुटरेजा यांचा सकारात्मक विचारांचा संदेश
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ सप्टेंबर २०२६ ।। धर्माच्या नावाने माणूस माणसापासून दुरावतो, अशा वातावरणात प्रेम, शांती आणि एकत्वाचा संदेश देणारा संत समागम पुण्यात पार पडला. संत निरंकारी मिशनच्या वतीने पुणे झोनचा निरंकारी इंग्लिश मीडियम संत समागम रविवार, १३ सप्टेंबर रोजी खराडी येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये झाला. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित या कार्यक्रमाला श्रद्धाळू, संत-महात्मे आणि सेवादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. राकेश मुटरेजा जी यांनी उपस्थितांना संबोधित केले. एका छोट्या बीजातून मोठा वृक्ष तयार होतो आणि अनेक वृक्षांतून वन उभे राहते, याचे उदाहरण देत त्यांनी व्यक्तीच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रेम, शांतता आणि सद्भावनेचा परिणाम संपूर्ण समाजावर होऊ शकतो, असे सांगितले. म्हणजे समाज बदलण्यासाठी नेहमी मोठ्या घोषणांची गरज नसते; बदलाची सुरुवात माणसाच्या विचारांपासूनही होऊ शकते, हा संदेश त्यांच्या विचारांतून देण्यात आला.
युवा पिढीला सत्संगतीचे महत्त्व पटवून देताना माशांचा बाजार आणि अत्तराचा बाजार यांची उदाहरणे देण्यात आली. ज्या वातावरणात माणूस राहतो, त्याचा प्रभाव त्याच्या विचारांवर आणि आचरणावर पडतो, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तरुणांनी सकारात्मक संगत आणि चांगल्या विचारांना जीवनात स्थान द्यावे, असा संदेश देण्यात आला. संत निरंकारी मिशनच्या विचारांमध्ये मानवी एकत्वाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले.
समागमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या निरंकारी प्रदर्शनीतून आध्यात्मिक विचार आणि जीवनमूल्ये प्रभावी पद्धतीने मांडण्यात आली. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून संकुचित विचारसरणीतून बाहेर पडून व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा देत असल्याचे सांगण्यात आले. जीवनातील परिस्थिती स्वीकारताना ‘शुकराणा’ म्हणजे कृतज्ञतेची भावना ठेवावी, असाही संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे झोनचे प्रभारी श्री. अशोक आहुजा जी यांनी श्रद्धाळू, संत-महात्मे आणि सेवादारांचे आभार मानले. गर्दी जमवणे सोपे; पण त्या गर्दीतून माणुसकीचा विचार रुजवणे अवघड. खराडीतील या समागमाने किमान तो प्रयत्न नक्कीच केला.
