![]()
उत्तीर्ण होण्यासाठी ७५ टक्के गुणांची अट; भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी स्वतंत्र रंगसंगती, रक्तगट व आपत्कालीन संपर्काची माहितीही प्रस्तावित
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। वाहन चालवण्याचा परवाना मिळवणे म्हणजे रस्त्यावर बेफिकिरी करण्याचा परवाना नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची जबाबदारी स्वीकारणे होय. याच जबाबदारीची जाणीव अधिक कठोर करण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनचालक परवान्याच्या नियमांत महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्यासाठी मसुदा अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, सुरक्षित वाहनचालनाच्या ऑनलाइन प्रशिक्षण मूल्यांकनात उत्तीर्ण होण्याची मर्यादा सध्याच्या ६० टक्क्यांवरून ७५ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. हे बदल अद्याप अंतिम झालेले नाहीत. मसुदा अधिसूचनेनुसार, नागरिकांना सूचना आणि हरकती मांडण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ७५ टक्के गुणांचा नियम लागू झाला, असे समजून अर्जदारांनी घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत.
प्रस्तावित बदलांनुसार, सुरक्षित वाहनचालनाचे ऑनलाइन प्रशिक्षण किमान ३० मिनिटांचे असावे आणि ते पूर्ण करण्यासाठी सात दिवसांऐवजी १५ दिवसांची मुदत मिळावी, अशी तरतूद सुचवण्यात आली आहे. मूल्यांकनात उत्तीर्ण होण्याची अट ७५ टक्क्यांपर्यंत वाढवल्याने वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील सुरक्षितता आणि जबाबदार वाहनचालनाविषयी अर्जदारांचे ज्ञान तपासण्यावर भर राहील. मात्र, ही अट प्रत्यक्ष वाहन चालवण्याच्या कौशल्याच्या चाचणीशी गल्लत करू नये. परवान्यावर भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी स्वतंत्र रंगसंगती ठेवण्यासह राष्ट्रीयत्व नमूद करण्याचाही प्रस्ताव आहे. रक्तगट, मोबाईल क्रमांक आणि आपत्कालीन संपर्काची माहिती अनिवार्य करण्याची तरतूदही मांडण्यात आली आहे. ओळख, वय आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी बदलण्याचा तसेच काही ऑनलाइन सेवांवरील शुल्क माफ करण्याचाही प्रस्ताव आहे.
या सुधारणांचा उद्देश कागदपत्रांतील गैरप्रकार रोखणे, परवाना प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि रस्ते सुरक्षिततेला बळ देणे हा आहे. मात्र, नियम कडक केले म्हणजे अपघात आपोआप थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, निष्पक्ष वाहनचालक चाचण्या आणि नियम मोडणाऱ्यांवर परिणामकारक कारवाईही आवश्यक आहे. सुरक्षित वाहनचालनाच्या मूल्यांकनात केवळ गुण मिळवणे नव्हे, तर धोक्याची जाणीव, पादचाऱ्यांचा आदर आणि वाहतुकीतील शिस्त तपासली पाहिजे. परवाना देणारी यंत्रणा दलालमुक्त आणि पारदर्शक राहिली, तरच या सुधारणांचा खरा फायदा नागरिकांना मिळेल. अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत वाहनचालकांनी सध्याचे नियम पाळावेत आणि नव्या तरतुदींसाठी मंत्रालयाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे.
