बांगलादेश पुन्हा हिंसाचाराच्या विळख्यात !

Spread the love

Loading

आवामी लीगच्या देशव्यापी लॉकडाऊनपूर्वी बॉम्बस्फोट, वाहनांची जाळपोळ; चार जणांचा मृत्यू, ढाक्यात ५६५ जणांना अटक, देशभर निमलष्करी दल तैनात

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। बांगलादेशात राजकीय संघर्षाने पुन्हा रक्तरंजित वळण घेतले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बंदी घातलेल्या आवामी लीग पक्षाने १९ नोव्हेंबरला पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राजधानी ढाक्यासह अनेक जिल्ह्यांत बॉम्बस्फोट, वाहनांची जाळपोळ आणि हल्ल्यांच्या घटना घडल्या. गेल्या दहा दिवसांत किमान २८ जिल्ह्यांत अशा घटना नोंदवल्याचे रॉयटर्सने वृत्त दिले आहे. ढाक्यातील तीन ठिकाणी कच्च्या बॉम्बचे स्फोट झाले असून किमान चार जण जखमी झाले. पिरोजपूरमध्ये बसला आग लावण्यात आल्याने बसमधील मदतनीसाचा जळून मृत्यू झाला. नराईलमध्ये बीएनपीचे दोन स्थानिक नेते, तर फरिदपूरमध्ये कृषक दलाच्या एका नेत्याचाही हिंसाचारात मृत्यू झाला. दोन दिवसांत देशभरात किमान चार जणांचा बळी गेल्याचे स्थानिक वृत्तांत सांगतात.

या अस्थिरतेचे मूळ शेख हसीना यांच्या संभाव्य मायदेशी परतण्याच्या घोषणेतही आहे. ऑगस्ट २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या हसीना भारतात वास्तव्यास आहेत. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याचा त्यांचा मानस असल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर आवामी लीगने आंदोलनाची हाक दिली. नोबेल पुरस्कारविजेते मुहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या किमान ३७ शाखा आणि कार्यालयांवर १० नोव्हेंबरपासून हल्ले किंवा आग लावण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती बँकेने दिली आहे. ढाक्यात २४ तासांत ५६५ जणांना अटक झाली असून त्यात बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित ७१ जणांचा समावेश आहे. माजी शिक्षणमंत्री नुरुल इस्लाम नाहिद यांनाही अटक झाल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधान तारिक रहमान यांनी लोकशाहीवादी शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले असून आवामी लीगला दहशतवादी संघटना संबोधले आहे. गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ढाक्यात सुरक्षा तपासणी नाके वाढवण्यात आले असून देशभरात सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र, राजकीय सूड, आरोप-प्रत्यारोप आणि रस्त्यांवरील हिंसाचार यांत सामान्य नागरिक भरडला जात आहे. सत्तांतर झाले, चेहरे बदलले; पण लोकशाहीच्या नावाखाली रस्त्यावर जाळपोळ सुरूच असेल, तर बांगलादेशच्या लोकशाहीचे भवितव्य कोण सुरक्षित करणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *