नाशिक फाटा-खेड मार्गाला अखेर गती

Spread the love

Loading

भूसंपादन शंभर टक्के पूर्ण; २९.९२ किमीच्या आठपदरी उन्नत मार्गामुळे पुणे-नाशिक प्रवास ७५ मिनिटांनी कमी होण्याचा दावा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। चाकणच्या वाहतूक कोंडीने वाहनचालकांच्या संयमाची परीक्षा घेण्याचा विक्रमच केला आहे. रस्त्यावर गाड्या असतात, पण वाहतूक मात्र पुढे सरकत नाही, अशी अवस्था अनेक वर्षांपासून आहे. आता या कोंडीवर उतारा म्हणून नाशिक फाटा ते खेड (राजगुरुनगर) आठपदरी उन्नत मार्गाला अखेर गती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कंत्राटदाराला कार्यादेश दिला असून पुढील महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होण्याची माहिती आहे. २९.९२ किलोमीटरचा हा मार्ग पुणे-नाशिक महामार्गावरील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ सुमारे ७५ मिनिटांनी कमी होईल, असा दावा NHAIचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी केला आहे. सध्या चाकण, भोसरी आणि औद्योगिक पट्ट्यातील कोंडीमुळे मालवाहतूक, कामगारांची ये-जा आणि उद्योगांचे दैनंदिन नियोजन यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे हा रस्ता केवळ सिमेंट-काँक्रीटचा प्रकल्प नसून औद्योगिक वाहतुकीचा श्वास मोकळा करण्याचा प्रयत्न आहे.

या प्रकल्पाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरलेले भूसंपादन आता पूर्ण झाल्याचे NHAIकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी सुमारे १६७.२७ हेक्टर जमीन आवश्यक होती. त्यातील उर्वरित जमिनीच्या ताब्याचा प्रश्न पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक जमिनीचा कागदोपत्री ताबा NHAIकडे दिल्याची माहिती आहे. महेश लांडगे यांनीही या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ जारी झाल्याची माहिती समोर आली असून आता प्रत्यक्ष कामासाठी नियुक्त दिनांक निश्चित होणे बाकी आहे. म्हणजेच कागदावरचा महामार्ग आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.

नाशिक फाटा ते खेड हा NH-60 वरील २९.९२ किलोमीटरचा प्रकल्प दोन पॅकेजमध्ये राबविला जाणार आहे. पहिल्या पॅकेजची लांबी १६.७३५ किलोमीटर, तर दुसऱ्या पॅकेजची १३.१८८ किलोमीटर आहे. दोन्ही पॅकेजसाठी ३६ महिन्यांचा बांधकाम कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मार्गावर नऊ प्रमुख जंक्शन, दोन मोठे पूल, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते तसेच प्रवेश-निर्गमनासाठी रॅम्प असणार आहेत. विद्यमान रस्त्याचेही चार/सहा पदरी स्वरूपात उन्नतीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने या ३० किलोमीटरच्या आठपदरी उन्नत कॉरिडॉरसाठी ७,८२७ कोटी रुपये भांडवली खर्च मंजूर केला आहे. त्यामुळे आता खरा प्रश्न ‘रस्ता कधी होणार?’ हा नसून, ठरलेल्या ३६ महिन्यांत काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होते का, हा आहे. कारण चाकणच्या कोंडीत वर्षानुवर्षे अडकलेल्या नागरिकांना आश्वासनांची नव्हे, तर मोकळ्या रस्त्यांची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *