Konkan Hapus : हापूसच्या नाममुद्रेसाठी कोकणचा एल्गार !

Spread the love

Loading

गुजरातच्या वलसाड हापूसचा स्वतंत्र जीआय दावा; शिवनेरी हापूसचीही दावेदारी, तामिळनाडूचा अर्ज चर्चेत; प्रसन्न पेठे यांची लोकप्रतिनिधींकडे मदतीची मागणी, नितेश राणेंचा पाठिंबा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। कोकणचा हापूस म्हणजे केवळ आंबा नाही, तर महाराष्ट्राची चव, परंपरा आणि जगभरातील बाजारपेठेत निर्माण झालेली विश्वासाची मुद्रा आहे. मात्र, याच हापूसच्या नावावर आता अन्य राज्यांतून दावेदारी होत असल्याने कोकणातील आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. २०१८ मध्ये कोकणातील हापूस (अल्फान्सो) आंब्याला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मिळाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांना या मानांकनाचे संरक्षण मिळाले. तत्कालीन केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने हा प्रयत्न यशस्वी झाला होता. मात्र, आता गुजरातमधील वलसाड हापूसला स्वतंत्र जीआय मानांकन मिळावे, यासाठी दावा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूसचाही अर्ज नोंदवला गेला आहे. तमिळनाडूतूनही हापूस नामांकनासाठी अर्ज दाखल झाल्याचे वृत्त आहे. म्हणजेच कोकणच्या आंब्याची ओळख आता केवळ बाजारपेठेतच नव्हे, तर कायदेशीर पातळीवरही आव्हानासमोर उभी आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून कोकणातील हापूस उत्पादक संस्था आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या दाव्याला कायदेशीर विरोध करत आहेत. गुजरातच्या वलसाड हापूस अर्जावर चेन्नई येथील जीआय रजिस्ट्रीमध्ये अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. रजिस्ट्रीने दोन्ही बाजूंना सामंजस्याने तोडगा काढण्याची सूचना केली; मात्र कोकणातील उत्पादकांनी हापूसच्या नावाची विभागणी मान्य नसल्याची भूमिका घेतली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या २१ नोव्हेंबरच्या वृत्तानुसार, कोकणातील चारही मानांकनधारक संस्थांनी तडजोडीचा प्रस्ताव नाकारला आहे. जुन्नरच्या शिवनेरी हापूस अर्जाची स्थितीही महत्त्वाची आहे. भारतीय जीआय नोंदणीच्या अधिकृत संकेतस्थळावर या अर्जाची स्थिती ‘विरोध नोंदवलेला’ अशी आहे.

रत्नागिरीतील आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी या लढ्याला पाठबळ द्यावे, अशी मागणी केली आहे. हापूस नावाने अन्य अर्ज दाखल झाल्यास त्यांना मान्यता मिळू नये, अशी त्यांची भूमिका आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही कोकणातील हापूस उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आणि आवश्यक मदत करण्याची ग्वाही दिली आहे. आता प्रश्न केवळ एका आंब्याच्या नावाचा नाही; तर शेतकऱ्यांच्या बाजारमूल्याचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि कोकणच्या भौगोलिक ओळखीचा आहे. जीआय मानांकन मिळवणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्याची अंमलबजावणी आणि संरक्षण करणेही आवश्यक आहे. अन्यथा कष्ट कोकणचे आणि नफ्याच्या नाममुद्रेवर दावे इतरांचे, अशी वेळ येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *