Gold Price Prediction 2028: सोन्याची पुन्हा उसळी; २०२८ मध्ये महागाईचा नवा विक्रम?

Spread the love

Loading

गोल्डमन सॅक्सचा मोठा अंदाज; २०२७ अखेरीस ४,६५० डॉलर, तर २०२८ मध्ये ५,६०० डॉलर प्रतिऔंसचा भाव गाठण्याची शक्यता

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। सोन्याच्या भावाने ग्राहकांच्या खिशाला बसवलेली झळ काहीशी कमी होत असतानाच आता पुन्हा महागाईचे ढग जमा होऊ लागले आहेत. वर्षभरात विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, ही घसरण म्हणजे सोन्याचे दिवस संपले, असा अर्थ काढणे घाईचे ठरेल. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक क्षेत्रातील आघाडीची गोल्डमन सॅक्स या बँकेने सोन्याबाबत दीर्घकालीन तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, २०२७ च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रतिऔंस ४,६५० डॉलर, तर २०२८ च्या अखेरीस ५,६०० डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. २४ नोव्हेंबरच्या बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार, एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा भाव प्रति दहा ग्रॅम सुमारे १,२६,११३ रुपये होता. त्यामुळे सव्वा लाखाच्या आसपास पोहोचलेले सोने ग्राहकांसाठी दिलासा ठरते की पुन्हा डोकेदुखी, हा प्रश्न कायम आहे.

गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, २०२७ अखेरीस ४,६५० डॉलर प्रतिऔंस हा भाव भारतीय चलनात साधारण १ लाख ३८ हजार ९११ रुपये प्रति दहा ग्रॅम होऊ शकतो. तर २०२८ अखेरीस ५,६०० डॉलर प्रतिऔंस झाल्यास भारतीय बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा भाव अंदाजे १ लाख ६७ हजार २३२ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या तेजीमागे जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी आणि भविष्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता ही प्रमुख कारणे आहेत. गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषकांच्या मते, २०२६ ते २०२८ या काळात मध्यवर्ती बँका दरमहा सरासरी ६० टन सोने खरेदी करू शकतात. मात्र, डॉलरचा विनिमय दर, आयात शुल्क आणि जागतिक बाजारातील परिस्थिती यामुळे भारतीय बाजारातील प्रत्यक्ष भाव वेगळा असू शकतो.  

दुसरीकडे, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह डिसेंबर २०२६ आणि मार्च २०२७ मध्ये प्रत्येकी २५ बेसिस पॉइंट्सने व्याजदर वाढवू शकते, असा गोल्डमन सॅक्सच्या अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. व्याजदर वाढले की डॉलर आणि रोख्यांचे आकर्षण वाढते. सोन्यावर व्याज मिळत नसल्याने गुंतवणूकदार सोन्याऐवजी रोख्यांकडे वळू शकतात. परिणामी सोन्याच्या दरावर दबाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे नजीकच्या काळात चढ-उतार कायम राहू शकतात. सोन्याची तेजी निश्चित आहे, असे समजून आजच खरेदीसाठी धाव घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. गोल्डमन सॅक्सचा ५,६०० डॉलरचा अंदाज हा बाजाराचा हमीभाव नसून आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असलेला अंदाज आहे. ग्राहकांनी भावातील चढ-उतार, शुद्धता, घडणावळ आणि कर लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *