पुणे विभागात सात महिन्यांत ६,९२४ आस्थापनांची तपासणी; ३०४ गुन्हे दाखल, ४०५ जणांना अटक, तुकाराम मुंढे यांच्या प्रशासनाचा कारवाईचा धडाका
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पुणेकरांच्या ताटात नेमके काय वाढले जात आहे, याची खात्री देण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अखेर भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाईचा वेग वाढवला आहे. मात्र, या कारवाईतून समोर आलेले आकडे पाहता नागरिकांच्या अन्नसुरक्षेची परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांत पुणे विभागात तब्बल ६ हजार ९२४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत २६ कोटी ३३ लाख रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला, ३०४ गुन्हे दाखल झाले आणि ४०५ जणांना अटक करण्यात आली. राज्यातील सात विभागांमध्ये पुणे विभागाने तपासणी आणि अन्ननमुने संकलनात आघाडी घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला पुणे विभागात वेग आला आहे. २ हजार ५३१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर २२४ परवाने निलंबित करण्यात आले. पुणे विभागाचा अतिरिक्त कार्यभार १ नोव्हेंबरपासून संयुक्त आयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या कारवाईत हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले. अशा १ हजार ५२८ आस्थापनांची तपासणी करून ८६९ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर १२१ परवाने निलंबित झाले. प्रशासनाने ४ हजार ६४४ अन्ननमुने तपासणीसाठी घेतले. प्रयोगशाळेच्या अहवालात ११३ नमुने असुरक्षित, ७६ नमुने निकृष्ट दर्जाचे आणि ३४ नमुने चुकीचे लेबल लावलेले आढळले. दूध भेसळीच्या संशयावरून १ लाख ५७ हजार ९६५ लिटर दूध जप्त करण्यात आले. त्याची किंमत ६६ लाख ७३ हजार रुपये आहे. दुग्धजन्य पदार्थांचे ८५५ नमुने तपासताना सात नमुने असुरक्षित आढळले आणि २ कोटी ३२ लाख १७ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. खाद्यतेलाच्या कारवाईत २ कोटी ६० लाख ७४ हजार रुपये, तर मसाले आणि मसाल्यांच्या पदार्थांमध्ये ५ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
राज्यभरातील कारवाईशी तुलना केली तर पुणे विभागातील मोहिमेचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते. संपूर्ण महाराष्ट्रात सात महिन्यांत २५ हजार ५१४ आस्थापनांची तपासणी, ११ हजार ५०६ सुधारणा नोटिसा, १ हजार ६५१ परवाने निलंबित आणि १५२ कोटी ६५ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. राज्यात १ हजार ६८८ जणांना अटक झाली. पुणे विभागातील ६ हजार ९२४ तपासण्या म्हणजे राज्यातील एकूण तपासण्यांच्या २७ टक्क्यांहून अधिक आहेत. मात्र, केवळ छापे, जप्ती आणि अटक यांच्या आकड्यांनी अन्नसुरक्षेचा प्रश्न सुटणार नाही. जप्त मालाचा पुरवठा कुठून झाला, भेसळखोरांना शिक्षा किती झाली आणि दोषी आस्थापनांवर पुन्हा कारवाई झाली का, याचीही माहिती जनतेसमोर आली पाहिजे. अन्यथा भेसळखोर आज पकडले जातील आणि उद्या पुन्हा नव्या नावाने बाजारात उतरतील. नागरिकांच्या ताटातील अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी एफडीएची ही मोहीम सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे.
