शाळा झाली ‘हॅपी’; १,२८४ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला!

Spread the love

Loading

आयडब्ल्यूसी पिंपरीचा स्तुत्य उपक्रम; पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांची अनमोल भेट

महाराष्ट्र 24 – पिंपरी : शाळा म्हणजे केवळ चार भिंती, फळा आणि पुस्तकांचे ओझे नव्हे; तर मुलांच्या स्वप्नांना पंख देणारे संस्कारमंदिर! मात्र, ज्या शाळेत स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा अपुऱ्या असतात, तिथे विद्यार्थ्यांनी आनंदाने शिकावे, अशी अपेक्षा करणे म्हणजे तहानलेल्या माणसाला पाण्याचे चित्र दाखवण्यासारखेच! हीच गरज ओळखून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी (आयडब्ल्यूसी पिंपरी) यांनी श्री गुरु विद्या मंदिर हायस्कूलमध्ये सर्वंकष ‘हॅपी स्कूल’ प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली. डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. दीपशिखा पाठक यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक स्वागताने झाली. उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. दीपशिखा पाठक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सकाळी अकरा वाजता ‘हॅपी स्कूल’ फलकाचे औपचारिक उद्घाटन झाले. शाळेच्या दारावर आनंदाचा फलक लावणे सोपे; पण त्या आनंदाला सुविधांची जोड देणे महत्त्वाचे, हे क्लबने कृतीतून दाखवून दिले.

या प्रकल्पाचा लाभ तब्बल १ हजार २८४ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामध्ये ५७२ प्राथमिक आणि ७१२ उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी २ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठी आणि हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतागृहांच्या सुविधांसह सॅनिटरी पॅड विल्हेवाट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळेच्या संरक्षण भिंतीचे रंगकाम करून परिसरालाही नवे रूप देण्यात आले. केवळ रंगरंगोटी करून शाळा सुंदर होत नाही, तर विद्यार्थ्यांचे आरोग्यही जपले गेले पाहिजे, याची जाणीव ठेवून डॉ. दीपाली पाटेकर यांच्या वतीने कर्करोग जनजागृती सत्र आणि मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. याशिवाय गोष्टींची पुस्तके, शालेय दप्तरे, क्रीडा साहित्य आणि अन्य आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यात आल्या. म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ शिकण्याची साधनेच नव्हे, तर निरोगी राहण्याची आणि खेळण्याची संधीही उपलब्ध झाली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयडब्ल्यूसी पिंपरीच्या अध्यक्षा वैशाली जैन, सचिव नीलम मेहता, खजिनदार शालिनी चोप्रा, माजी अध्यक्षा मनीषा समर्थ, संपादक स्मिता टिळेकर, सुनीता कुलकर्णी, भावना जी आणि वृंदा आंबेकर उपस्थित होत्या. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हा उपक्रम साकार झाला. समाजसेवा म्हणजे केवळ भाषणांतून संवेदनशीलतेचे प्रदर्शन नव्हे, तर गरज ओळखून प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणे होय. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या हातातील पुस्तके आणि शाळेतील नव्या सुविधा हेच या प्रकल्पाचे खरे यश आहे. शिक्षणाच्या मंदिरात सुविधा असतील, आरोग्याची काळजी असेल आणि आनंदाचे वातावरण असेल, तरच उद्याची पिढी सक्षम होईल. आयडब्ल्यूसी पिंपरीच्या या ‘हॅपी स्कूल’ उपक्रमाने समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *