आयबीएमचा भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांसाठी व्हिसा, ग्रीन कार्ड प्रायोजकत्व बंद; निर्णयासाठी अवघे तीन आठवडे
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। न्यूयॉर्क : अमेरिकेत मोठ्या पगाराच्या नोकरीचे आणि स्थिर भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांसमोर आता परतीचा किंवा बेरोजगारीचा पेच उभा राहिला आहे. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयबीएमने (IBM) आपल्या कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांसाठी अमेरिकेतील व्हिसा आणि ग्रीन कार्ड प्रायोजकत्व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका एच-१बी व्हिसाधारकांसह कायमस्वरूपी वास्तव्याच्या प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बसू शकतो. प्रभावित कर्मचाऱ्यांना अमेरिकेबाहेरील आयबीएममधील पद स्वीकारायचे किंवा कंपनी सोडायची, असे दोन पर्याय देण्यात आल्याचे वृत्त आहे. निर्णय घेण्यासाठी अवघे तीन आठवडे देण्यात आले असून, नोकरी सोडणाऱ्यांसाठी ३१ डिसेंबर २०२६ हा अखेरचा कामाचा दिवस निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जाते. अशा कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन भरपाई म्हणून मिळणार असल्याचेही वृत्त आहे. अमेरिकेत वर्षानुवर्षे नोकरी, घर आणि कुटुंब उभे केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा केवळ कार्यालय बदलण्याचा प्रश्न नाही; तर संपूर्ण आयुष्याची घडी विस्कटण्याची वेळ आहे.
आयबीएम कन्सल्टिंग विभागात जगभरात दीड लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या निर्णयामुळे नेमके किती कर्मचारी प्रभावित होणार, याचा आकडा कंपनीने जाहीर केलेला नाही. *रेस्ट ऑफ वर्ल्ड*च्या वृत्तानुसार, १९ नोव्हेंबर रोजी आयबीएमच्या करिअर पोर्टलवर अमेरिकेबाहेरील कन्सल्टिंग विभागाच्या १,२७८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी तब्बल १,१२५ जागा भारतात, २३ सिंगापूरमध्ये आणि १८ ब्रिटनमध्ये होत्या. त्यामुळे भारत हे बदलीसाठी प्रमुख ठिकाण ठरू शकते; मात्र उपलब्ध जागा म्हणजे प्रत्येक प्रभावित कर्मचाऱ्याला योग्य पद मिळेल, याची हमी नव्हे. पदाचा स्तर, वेतन, कामाचे स्वरूप आणि कुटुंबाची परिस्थिती यांचा ताळमेळ बसणेही आवश्यक आहे. एका कर्मचाऱ्याने भारतात बदली स्वीकारल्यास वेतनात सुमारे ८० टक्क्यांची घट होऊ शकते, असा दावा अनामिक कर्मचारी मंचावर केला आहे; मात्र हा कंपनीने जाहीर केलेला अधिकृत वेतननिकष नाही.
आयबीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची उपलब्धता आणि ग्राहकांच्या गरजा बदलत असल्याने अमेरिकेतील उच्च-कौशल्य व्हिसा कार्यक्रमांवरील कंपनीचा अवलंब गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे. त्यामुळे कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांसाठी व्हिसा आणि ग्रीन कार्ड प्रायोजकत्व थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय संपूर्ण आयबीएमसाठी नसून केवळ कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांपुरता मर्यादित आहे, हेही कंपनीने स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील परदेशी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवर वाढत असलेली सरकारी नजर आणि बदलते स्थलांतर धोरण या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. मात्र, कंपनीच्या व्यावसायिक गरजांचा भार कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर टाकताना त्यांच्या कुटुंबांचे, आर्थिक बांधिलकीचे आणि वर्षानुवर्षे उभारलेल्या आयुष्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
