संविधान शिल्पातून लोकशाहीचा जागर

Spread the love

Loading

सांगवीत नूतनीकृत संविधान शिल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण; शर्मिला बाबर, प्रशांत शितोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती, प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। संविधान दिन आला की भाषणे, पुष्पहार आणि घोषणांचा धुरळा उडतो; मात्र संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये प्रत्यक्ष जीवनात किती उतरतात, याचा हिशेब कोण देणार? केवळ स्मारके उभारून आणि शिल्पांचे लोकार्पण करून संविधानाचा सन्मान होत नाही, तर त्यातील विचार आचरणात आणावे लागतात. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२ मधील सांगवी येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या भारतीय संविधान शिल्पाचे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव नागरिकांना करून देण्यासाठी हे शिल्प प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन जगताप यांनी केले. संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, पल्लवी जगताप, उज्वला ढोरे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी प्रफुल्ल पुराणिक यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी त्यांच्यासोबत सामूहिक वाचन करून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्याची मूल्ये जपण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समान संधी आणि व्यक्तीची प्रतिष्ठा यांचा संकल्प यावेळी पुन्हा अधोरेखित करण्यात आला.

नूतनीकृत संविधान शिल्पामुळे सांगवी परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधानाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र, संविधानाचा गौरव केवळ चौकातील शिल्पापुरता मर्यादित राहता कामा नये. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता, नागरिकांना समान वागणूक, सामाजिक न्याय आणि प्रशासनाची उत्तरदायित्वाची भावना दिसली, तरच या लोकार्पणाला खरा अर्थ प्राप्त होईल. संविधानाची प्रास्ताविका वाचणे सोपे आहे; तिच्यातील मूल्ये रोजच्या व्यवहारात पाळणे ही खरी परीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *