![]()
२०२७ च्या पहिल्या सहामाहीत सोन्याला घसरणीचा फटका; वर्षअखेरीस तोळ्याचा भाव दीड लाखांवर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। सोन्याच्या दरांनी गेल्या काही काळात दिलेल्या धक्क्यांमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांचीही झोप उडाली आहे. कधी भाव आकाशाला भिडतात, तर कधी अचानक घसरण होऊन खरेदीदारांना दिलासा मिळतो. आता २०२७ मध्ये सोन्याचे दर १० ग्रॅममागे १ लाख १२ हजार रुपयांपर्यंत खाली येणार की १ लाख ५० हजारांचा टप्पा गाठणार, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. कमोडिटी बाजारातील विश्लेषकांच्या मते, पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्यावर दबाव राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदरविषयक धोरण, डॉलरची ताकद आणि अमेरिकन सरकारी रोख्यांवरील परतावा हे सोन्याच्या दरांना दिशा देणारे महत्त्वाचे घटक ठरणार आहेत. डॉलर मजबूत झाला आणि बाँडवरील परतावा वाढला, तर व्याज न देणाऱ्या सोन्याची गुंतवणूक तुलनेने कमी आकर्षक ठरू शकते. मात्र, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी यामुळे तेजीला पुन्हा बळ मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
‘व्हेंचुरा कमोडिटीज अँड सीआरएम’चे प्रमुख एन. एस. रामास्वामी यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरांबाबत तिमाहीनिहाय अंदाज मांडला आहे. त्यांच्या मते, २०२७ च्या पहिल्या तिमाहीत सोन्याचा दर प्रति औंस ३,४०० ते ३,७०० डॉलर, दुसऱ्या तिमाहीत ३,६०० ते ४,००० डॉलर, तिसऱ्या तिमाहीत ४,२०० ते ४,८०० डॉलर आणि वर्षाच्या अखेरीस ४,९०० ते ५,२०० डॉलरपर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, पीएल कॅपिटलचे कमोडिटी विभागप्रमुख आशिष राजोडिया यांच्या अंदाजानुसार, पुढील सहा महिन्यांत भारतात १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख १२ हजार ते १ लाख ३५ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो. पुढील १२ महिन्यांत हा पट्टा १ लाख २० हजार ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत विस्तारण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. चांदीबाबतही त्यांनी पुढील वर्षभरात किलोमागे १ लाख ४० हजार ते १ लाख ९० हजार रुपयांचा अंदाज मांडला आहे.
मात्र, बाजारात तेजीचा अंदाज व्यक्त करणारे तज्ज्ञ आहेत म्हणून सोन्याचे दर सरळ वरच जाणार, असे समजणे धोक्याचे आहे. रॉयटर्सच्या ऑक्टोबरमधील ३० विश्लेषकांच्या सर्वेक्षणात २०२७ साठी सोन्याचा सरासरी दर ४,६५० डॉलर प्रति औंस राहण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे; तर गोल्डमन सॅक्सने नोव्हेंबरमध्ये आपला २०२७ अखेरचा अंदाज ४,८०० डॉलरपर्यंत कमी केला. म्हणजेच तज्ज्ञांचे अंदाजही एकसारखे नाहीत. डॉलरची दिशा, व्याजदर, जागतिक संघर्ष, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि गुंतवणूकदारांचा कल यावर सोन्याचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे १ लाख १२ हजारांचा दर असो वा दीड लाखांचा टप्पा, हे निश्चित भाव नसून संभाव्य अंदाज आहेत. लग्नसराईसाठी सोने घेणाऱ्या ग्राहकांनी केवळ तेजी-घसरणीच्या भाकितांवर निर्णय घेऊ नये. बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन व्यवहार करणे आवश्यक आहे.
