![]()
आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून चार महत्त्वाच्या प्रकल्पांना गती; कल्पतरू चौकात सबवे, चिंचवडला नवा रेल्वे पूल, पी.के. चौक सिग्नलमुक्त, डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची लांबी वाढणार
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीने नागरिकांचा रोजचा प्रवास म्हणजे जणू अग्निपरीक्षाच बनवली आहे. वाकडपासून थेरगावपर्यंत आणि पिंपळे गुरवपासून पिंपळे सौदागरपर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, चौकाचौकांतील सिग्नल आणि वाढता प्रवासी ताण यामुळे नागरिकांचे तासन्तास वाया जात आहेत. या कोंडीवर उपाय म्हणून आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे वाहतूक सुधारणांच्या दृष्टीने हालचालींना सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार, हा खरा प्रश्न आहे. निविदा प्रसिद्ध होणे म्हणजे प्रकल्प पूर्ण होणे नव्हे; कागदावरील आश्वासनांचे प्रत्यक्ष रस्त्यावर रूपांतर होणे गरजेचे आहे. तरीही या चार प्रकल्पांमुळे शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवरील अडथळे कमी करण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
या योजनेत वाकड ते नाशिक फाटा मार्गावरील कल्पतरू चौकात सबवे उभारण्याचा समावेश आहे. यामुळे पिंपळे गुरव परिसरातील वाहतुकीला मदत होण्याची अपेक्षा आहे. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहे. पिंपळे सौदागरमधील पी.के. चौक सिग्नलमुक्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तर डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची थेरगाव फाट्याकडील लांबी वाढविण्यात येणार आहे. महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत या चारही कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रकल्पांचा लाभ वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि थेरगाव परिसरातील वाहनचालकांना होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत चौकांमधील वाहनांच्या रांगा कमी होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होऊ शकते.
आमदार शंकर जगताप म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि थेरगावमधील वाढता वाहतूक ताण लक्षात घेऊन हे चार प्रकल्प हाती घेतले आहेत. सबवे, नवीन रेल्वे उड्डाणपूल, पी.के. चौक सिग्नलमुक्त करणे आणि डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची लांबी वाढविणे यामुळे वाहतूक अधिक वेगवान व सुरक्षित होण्यास मदत होईल. नागरिकांचा वेळ वाचणे आणि दळणवळण व्यवस्था सक्षम करणे हाच उद्देश आहे.” मात्र, निविदा प्रक्रिया, कंत्राटदारांची नियुक्ती, निधीची उपलब्धता आणि कामांची मुदत याबाबत स्पष्ट वेळापत्रक जाहीर होणे आवश्यक आहे. कारण नागरिकांना घोषणांचा नव्हे, तर प्रत्यक्ष कोंडीमुक्त रस्त्यांचा अनुभव हवा आहे.
