![]()
शहरात रोज ५२० एमएलडी सांडपाणी; ४८० एमएलडीवर प्रक्रिया, उर्वरित ४० एमएलडीसाठी चिखलीत नवे प्रकल्प; २०४१ पर्यंत ८४५ एमएलडी क्षमतेचे उद्दिष्ट
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असताना सांडपाण्याचा प्रश्नही तितक्याच वेगाने गंभीर बनत आहे. उंच इमारती, वाढत्या गृहसंकुलांची संख्या आणि लोकसंख्येचा वाढता भार यामुळे शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहितीनुसार, शहराला दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी ८० टक्के पाणी वापरानंतर सांडपाण्याच्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणजेच दररोज सुमारे ५२० एमएलडी सांडपाणी निर्माण होते. यापैकी महापालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्रांमध्ये (एसटीपी) ४०० एमएलडी, तर खासगी केंद्रांमध्ये ८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. एकूण ४८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होत असली, तरी उर्वरित ४० एमएलडीचा प्रश्न कायम आहे. आकडेवारी मांडून नदीप्रदूषण थांबत नाही; त्यासाठी प्रत्यक्ष प्रक्रिया, गुणवत्तेचे नियंत्रण आणि नियमित देखरेखही तितकीच महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या डिसेंबर २०२५ मधील आकडेवारीत शहरातील सांडपाणी निर्मिती ५१५ एमएलडी आणि उपलब्ध प्रक्रिया क्षमता ४२३ एमएलडी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे नव्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कार्यरत प्रक्रिया क्षमतेची स्वतंत्र पडताळणीही आवश्यक ठरते.
ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने चिखली परिसरात दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. चिखली स्मशानभूमीजवळ २० एमएलडी क्षमतेच्या एसटीपीचे काम सुरू असून, रिव्हर रेसिडेन्सी परिसरात ४० एमएलडी क्षमतेच्या केंद्रासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. म्हणजेच या दोन प्रकल्पांतून आणखी ६० एमएलडी प्रक्रिया क्षमता उपलब्ध होणार आहे. मात्र, कागदावर प्रकल्प मंजूर होणे आणि प्रत्यक्षात ते सुरू होऊन अपेक्षित क्षमतेने प्रक्रिया करणे, यात मोठा फरक असतो. यापुढील नियोजनासाठी महापालिकेने सिव्हरेज मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार २०३१ पर्यंत ३३५ एमएलडी आणि २०४१ पर्यंत आणखी ५१० एमएलडी क्षमतेची नवीन एसटीपी केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच भविष्यात एकूण ८४५ एमएलडी अतिरिक्त प्रक्रिया क्षमता निर्माण करण्याचे नियोजन आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी आराखड्याला निधी, जागा, कामांची मुदत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची जोड मिळाली तरच त्याचे फलित दिसेल.
महापालिकेच्या दाव्यानुसार सध्या अस्तित्वातील सर्व एसटीपी केंद्रे कार्यरत आहेत. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही शहरातील एसटीपींच्या कार्यक्षमतेबाबत आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे केवळ केंद्रे कार्यरत असल्याचे सांगून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित पर्यावरणीय निकषांनुसारच नदीत सोडले जाते का, याची नियमित तपासणी आणि अहवाल सार्वजनिक होणे गरजेचे आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर असल्याचे स्पष्ट केले आहे. आता या घोषणांचे रूपांतर प्रत्यक्ष कामात किती वेगाने होते, यावरच तीन नद्यांचे भवितव्य आणि शहराच्या पर्यावरणाचे आरोग्य अवलंबून आहे.
