महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ नोव्हेंबर -मुंबई : शालेय शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टीचे शासन परिपत्रक गुरुवारी जारी केले. यंदा केवळ 5 दिवसच 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, या सुट्टीमुळे शिक्षक व विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली आहे. दरवर्षी तब्बल 20 दिवस दिवाळीची सुट्टी दिली जाते, यंदा मात्र कोरोनामुळे घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिवाळी सणाच्या आनंदावर या परिपत्रकामुळे पाणी पडले आहे.
यंदा 12 ते 16 नोव्हेंबर या काळात दिवाळी सण साजरा होणार आहे. त्यामुळे एकूण शैक्षणिक कामकाजाचे दिवस लक्षात घेता या महत्त्वाच्या दिवशीच ऑनलाईन शिक्षणाला सुट्टी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा संहितेनुसार एकूण सुट्टय़ा 76 असणे तसेच शालेय कामकाजाचे दिवस 230 असणे आवश्यक आहे.
किमान 15 दिवस सुट्टी हवी
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळी सुट्टीच्या परिपत्रकाचा फेरविचार करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांनी केली आहे. दिवाळीसाठी केवळ 5 दिवस सुट्टी दिल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने किमान 15 दिवसांची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.