महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० नोव्हेंबर – संपादक ; सुनील आढाव – पिंपरी चिंचवड : येत्या 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान दीपावली साजरी होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा दीपावली सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरीकरांना केले आहे. नवरात्रौत्सव, दसरा उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्येदेखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबविता येईल, असे आ. आण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू, असे आ. अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड येथील कोरोना बाधितांचा दर घटत चालला आहे. आपल्याला शहरातून कोरोना हद्दपार करायचा आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचवेळी दिवाळी साजरी करताना घ्यावयाची खबरदारी आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. थोडक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर साधेपणाने दिवाळी साजरी करावी. असेही बनसोडे यांनी म्हटले आहे.
13 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, 14 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी, व 16 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा, भाऊबीज साजरी होणार आहे. त्यामुळे यांदाची दिवाळी ही 3 दिवसांचीच असणार आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, आनंदाचे उधाण, जुने मतभेद हेवेदावे विसरून एकमेकांना आनंदाने भेटण्याचे दिवस, नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्या भेटीचा सण आणि त्याचबरोबर मुलांचा उत्साह, आनंद म्हणजे फटाके! फटाक्यांची आतषबाजी, धूमधडाका. रात्र झाली की हवेत उडणा-या रंगीबेरंगी फटाक्यांनी आसमंत उजळून निघतो. फटाक्यांच्या धूमधडाक्याने परिसर व्यापून जातो. मुलांच्या उत्साहाला आणि मोठ्यांच्या अतिउत्साहाला उधाण येते. हेच फटाके ध्वनी आणि वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरत असतात. याकडे मात्र आपले लक्ष नसते किंवा असून, सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जातो. फटाक्यांच्या आवाजाने ध्वनिपदूषण तर होतेच, परंतु फटाक्यांच्या धुरामुळे हवेच्या प्रदूषणाचा स्तरही वाढतच जातो. यामुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार वाढतात, वृद्धांना ध्वनी आणि वायुपदूषणाचा भयंकर त्रास होतो, लहान मुले, नवजात अर्भके, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.
फटाक्यातून निघालेल्या धुरात प्रचंड प्रमाणात विषारी वायू हवेत मिसळत असतो. मोठय़ा फटाक्यातून कार्बन मोनोक्साईड हा वायूसुद्धा बाहेर पडत असतो. यामुळे श्वसनाचे विकार, सर्दी, खोकला, डोळे झोंबणे वगरे विकार होत असतात. फटाक्यांच्या आतषबाजीच्या नादात मुंबईतील वायुपदूषणाला आपणच हातभार लावत असतो. डॉ. महेश बेडेकर यांच्या मताप्रमाणे लहान मुलांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आणि जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याची संकल्पना रुजवायला हवी. लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्यास एक दिवस खरोखरच फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल!