बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर – पुणे : येथिल बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale ) यांची ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली. परकीय चलनासंदर्भातल्या फेमा कायद्याअंतर्गत ही चौकशी करण्यात आली. मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. अविनाश भोसलेंच्या ईडी चौकशीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. पण संध्याकाळच्या सुमारास माध्यमांना त्यांची माहिती मिळाली. अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी झाल्याने राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

अविनाश भोसले यांची मुंबईतील ईडी कार्यालयात पाच तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काल सकाळी १० वाजता भोसले ईडी कार्यालयात पोहोचले होते. चौकशीनंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानुसारच भोसले काल सकाळी मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचल्याचे सांगण्यात आले. विदेशी चलन प्रकरणात फेमा (FEMA) कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील कागदपत्रांचीही छाननी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. यापूर्वीही अनेक कारणांनी त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात भोसले यांचा दबदबा राहिला आहे. याआधी आयकर विभागाकडूनही भोसले यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *