महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । गेली अनेक वर्षे रखडलेले चिपी विमानतळ गणेशोत्सवाच्या आधी प्रवाशांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे काम विमानतळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली समाधानकारक पूर्ण झाले आहे. विमानतळावरुन प्रत्यक्ष विमानसेवा गणेश चतुर्थीपुर्वी सुरु होईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
‘विमानतळाच्या प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली धावपट्टीचे काम समाधानकारक पूर्ण झाले आहे. २८ जूनला सदर काम पूर्ण झाल्याचा आहवाल आयआरबी कंपनीने नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) पथकाकडे दिला आहे,’ अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे.
डीजीसीए पथकानं प्रवासी वाहतूकीसाठी धावपट्टी परिपूर्ण असल्याची पाहणी करुन अहवाल द्यावा, असे पत्र आयआरबी कंपनीने डीजीसीए पथकाकडे दिलं आहे. डीजीसीए पथकाने चिपी विमानतळाची पहाणी करून प्रवासी वाहतुकीचे लायसन्स दिल्यानंतर चिपी विमानतळावरून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होईल,’ असे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत.
‘एव्हीकेशन प्राधिकरणाचे सचिव प्रदीप खुराणा यांनी धावपट्टीसहित विमानतळाची सर्व कामे शंभर टक्के पूर्ण झाली असून प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळ योग्य आहे,’ असे पत्र खासदार राऊत याना दिले आहे. ‘चिपी विमानतळ येथे कार्यालयीन इमारतीत विमान कंपनीचे तिकीट खिडकी व कर्मचारी उपलब्ध आहेत,’ अशीही माहिती समोर येत आहे. चिपी विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवा गणेश चतुर्थीपुर्वी सुरू होणार असल्याचे आश्वासन खासदार राऊत यांनी पुन्हा एकदा दिल्यानं. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पर्यायी मार्ग सापडेल.