महाराष्ट्रात पावसाचं रौद्ररुप, पुराचा वेढा तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता सांगली आणि कोल्हापूरला देखील महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री 25 हजार क्यूसेकने पाणी सोडल्यानंतर शहरातील डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला होता. सकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या जलपर्णीमुळे मोठा कचरा निर्माण झालाय, सध्या भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.

लोणावळ्यात गेली दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे चोवीस तासात 322 मिमी पावसाची नोंद झाली. तर गेल्या 48 तासात 712 मिमी पाऊस कोसळला. परिणामी लोणावळा शहर आणि परिसरातुन वाहणारी इंद्रायणी नदी पात्र सोडून वाहत होती. काही ठिकाणी सखल भागात पाणी ही साचले होते.

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयनेतून आज दुपारपर्यंत 50000 क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते. सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सांगलीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून पूर पट्ट्यात नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीम पूर पट्ट्यात फिरून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सांगलीत काल सायंकाळी 7 च्या सुमारास पूर पातळी 27 वर पोहोचल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून पूर पट्ट्यात नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आहेत. ज्यांच्याकडे राहण्याची सोय नाही अशा नागरिकांसाठी महापालिकेने शाळा क्रमांक 14 आणि शाळा क्रमांक 24 या दोन ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र सुरू केले आहे. रात्रीत पाणी पातळी वाढणार असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले असून महापालिकेचे वैद्यकीय, आपत्कालीन तसेच अग्निशमन विभागाकडून पूर स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे

कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. आंबेवाडी, चिखली गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. शहरातील सुतार माळ परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. चिखली गावातील लोकांना स्थलांतरित केले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहरातही पाणी यायला सुरुवात झाली आहे. पुणे-बंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यमगर्णी जवळ महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक अडवली आहे. राधानगरी तालुक्यातील कोनोली येथे घर कोसळून दोन जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धामणी नदीच्या पुरात एक म्हैस, एक बैल गेला वाहून गेला आहे. पन्हाळा मार्गावर अडकलेल्या कर्नाटकच्या बसमध्ये अडकलेल्या 22 जणांना काढले सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *