‘राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात…… ‘; पक्षफुटीवरुन शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । Sharad Pawar Slams Raj Thackeray: महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. एकूण 13 मतदारसंघांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून यामध्ये मुंबई आणि उपनगरातील मतदारसंघाचा समावेश असल्याने राजकीय प्रचाराला अधिक जोर आहे. अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. नुकत्याच कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदार पुत्रासाठी घेतलेल्या सभेत राज यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मात्र या टीकेला आता शरद पवारांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंना लगावला टोला
कल्याणमधील सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करताना शरद पवारांनी अनेक राजकीय पक्ष फोडल्याचा आरोप केला. पवारांनी अनेक पक्ष फोडण्याचं काम यापूर्वी केल्यानेच त्यांचा पक्षही फुटला, असा टोला शरद पवारांना लगावला. या टीकेसंदर्भात शरद पवारांना पत्रकारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, “राज ठाकरे नक्की काय म्हणाले मला ठाऊक नाही. राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय आहे हे देखील मला ठाऊक नाही. मी असं ऐकलेलं की, त्यांचा नाशिकमध्ये स्ट्राँग बेस आहे. मात्र मला हल्ली नाशिकमध्ये ना ते दिसतात ना त्यांचा पक्ष,” असा टोला लगावला.

शिवसेना राष्ट्रवादीत विलीन होणार?
भविष्यात काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसचं नेतृत्व मान्य करतील असं विधान पवारांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये केलं होतं. या विधानावरुन बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्यातही भाजपाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी शक्यता बोलून दाखवली. यासंदर्भातील पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपण केवळ छोट्या पक्षांबद्दल बोललो होतो असं पवारांनी नमूद केलं. “मी छोट्या राजकीय पक्षांबद्दल बोलेलो. मी शिवसेनेबद्दल बोललो नव्हतो. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. विधानसभेत शिवसेना हा भाजपानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष असून 2019 च्या विधानसभेला त्यांच्या पक्षाचे 56 आमदार निवडून आलेले. आमचे 54 आमदार होते तर काँग्रेसचे 40 ते 45 आमदार होते. शिवसेना ही विधानसभेतील मोठी शक्ती आहे. मी ते विधान त्यांच्या पक्षाबद्दल केलेलं नव्हतं,” असं शरद पवारांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *