महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी- महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा बिगुल वाजण्याआधीच पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील सर्वात पहिला पॅनल जाहीर करून राजकीय मैदान तापवले आहे. प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथून या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करताना “आम्ही तयार आहोत” असा स्पष्ट संदेश राष्ट्रवादीने दिला आहे.
या प्रचाराचा नारळ फोडण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रचार प्रमुख तसेच माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते पार पडला. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री. मुजोबां महाराज यांच्या मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. धर्म, परंपरा आणि विकास यांचा संगम साधत राष्ट्रवादीने प्रचाराची सुरुवात केल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
या पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवार श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातून सौ. मिनाक्षी अनिल काटे, तसेच सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून सौ. शीतलताई नाना काटे व सौ. सायली उमेश काटे यांचा समावेश आहे. पिंपळे सौदागर गावठाणापासून भव्य पदयात्रेला सुरुवात करत संपूर्ण परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत ग्रामस्थ, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचारफेरीदरम्यान जागोजागी उमेदवारांचे औक्षण करण्यात आले. “नारळ फुटला म्हणजे निवडणूक सुरू झाली” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले की, शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये दोन महिला व दोन पुरुष उमेदवारांचा पॅनल असतो. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील एकमेव प्रभाग क्रमांक २८ असा आहे की, जिथे राष्ट्रवादीने तीन महिला व एक पुरुष असा वेगळा, प्रगत आणि महिलांना नेतृत्वाची संधी देणारा पॅनल दिला आहे. हा पॅनल म्हणजे केवळ उमेदवारांचा समूह नसून, विकासाचा संकल्प आहे, असे सांगत त्यांनी या पॅनलला शहरातील सर्वाधिक आणि भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
एकूणच, प्रचाराचा नारळ फुटताच प्रभाग २८ मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, राष्ट्रवादीने पहिल्याच पावलात आघाडी घेतल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे.
