“आम्ही फक्त सतरंज्या उचलायला जन्माला आलो आहोत का?” – जुने कार्यकर्ते संतप्त
महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – सुनील आढाव -पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १३ सध्या एका वेगळ्याच राजकीय धगधगाटात सापडला आहे. भारतीय जनता पार्टीकडून आयात उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेमुळे पक्षातील जुने, निष्ठावंत आणि तळागाळात राबणारे कार्यकर्ते उघडपणे संतप्त झाले आहेत. “पक्ष वाढवण्यासाठी आयुष्य खर्ची घातले आणि निवडणुकीच्या वेळी बाहेरच्यांना रेड कार्पेट?” असा थेट सवाल आता कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
या असंतोषाला वाचा फोडली आहे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी. फेसबुक व व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केलेल्या पोस्टमधून त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर कोरडे ओढले आहेत. “कार्यकर्त्यांनी केवळ पोस्टर लावायचे, सतरंज्या उचलायच्या आणि नेत्यांच्या मागे पुढे करायचे का?” हा सवाल केवळ एका व्यक्तीचा नसून, प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद असल्याचे स्पष्ट होते.
अलीकडेच इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांना भाजपमध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला. मात्र, अशा आयात उमेदवारांना थेट निवडणुकीचे तिकीट दिल्यास वर्षानुवर्षे पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मधून आलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा घाट घातल्याचा आरोपही उघडपणे केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणी प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. भाजप हा सामान्य, कष्टकरी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याने संघटनात्मक निष्ठेला प्राधान्य द्यावे व आयात उमेदवारी तात्काळ रद्द करावी, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयोग पक्षासाठी घातक ठरू शकतो, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. “कार्यकर्ता दुखावला तर पक्ष जिंकला तरी हरतो,” अशी खमंग प्रतिक्रिया देत प्रभाग १३ मध्ये आयात राजकारणाविरोधात बंडाची ठिणगी पडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.