Gold-Silver Rate Crash: दरवाढीची मस्ती उतरली! सोनं-चांदी थेट जमिनीवर; बाजारात घसरणीचा धक्का, खरेदीदार-गुंतवणूकदार गोंधळात

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | मंगेश खंडाळे | दि. ६ फेब्रुवारी २०२६ | सोनं-चांदीने गेल्या काही आठवड्यांत जी झिंग चढवली होती, ती अखेर उतरली आहे. “आज नाही घेतलं तर उद्या हाताबाहेर” अशी धावपळ करणारा बाजार आता थबकला आहे. सलग दरवाढीनंतर अचानक आलेल्या घसरणीने सराफा बाजारात शांतता पसरली आहे. सध्या सोन्याचा भाव सुमारे १.५० लाख रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर आला असून, चांदीचा दर २.३० लाख रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे. काही दिवसांपूर्वी जे दर ऐकून डोळे विस्फारले जात होते, तेच दर आता “अजून खाली येतील का?” या प्रश्नाने पाहिले जात आहेत. दुकानदारांपेक्षा जास्त चर्चा आता आकड्यांची आहे आणि खरेदीपेक्षा प्रतीक्षा वाढली आहे.

मागील महिन्यातील चित्र मात्र वेगळंच होतं. जानेवारीच्या अखेरीस चांदीचा दर तब्बल ४.२० लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता, तर सोनंही १.९३ लाख रुपये प्रति १० ग्रॅम या उच्चांकाच्या आसपास फिरत होतं. अर्थसंकल्पानंतर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे या दरांना आणखी बळ मिळालं. मात्र, डॉलरची मजबुती, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि नफाबुकिंगचा वाढता दबाव यामुळे चित्र पालटलं. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याच्या एप्रिल वायद्यात १ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली, तर चांदीच्या मार्च फ्युचर्समध्ये थेट ६ टक्के घसरण झाली. सलग दुसऱ्या सत्रात चांदीला जबर धक्का बसल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान वाढले आहे.

या चढ-उतारात सर्वसामान्य खरेदीदार मात्र अडकलाय. लग्नसराई तोंडावर आहे; खरेदी टाळता येत नाही, पण दर पाहून हात आखडता घ्यावा लागतो. आज सोनं-चांदी स्वस्त वाटत असलं, तरी कालच्या उच्चांकांशी तुलना केली तर ही घसरण डोळ्यात भरणारी आहे. बाजाराने पुन्हा एकदा सांगितलंय की, सोनं-चांदी सुरक्षित मानली जात असली तरी ती भावनांवर नाही, तर जागतिक गणितांवर चालतात. आज ओहोटी आहे, उद्या भरती येईलही—पण जो संयम ठेवेल, तोच या खेळात टिकेल. कारण सराफा बाजारात चमक क्षणिक असते, हिशोब मात्र कायमचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *