दुष्काळात सर्वांना धान्याचा आधार!

Spread the love

Loading

पांढरी, केशरी, पिवळी अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; १८ लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान.

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दुष्काळाने शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे राहण्याआधीच त्यांच्या आशा करपवल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करून गावकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पांढरी, केशरी आणि पिवळी अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना दुष्काळ असेपर्यंत अन्नधान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. आदेश अद्याप जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले नसण्याची शक्यता त्यांनी स्वतःच व्यक्त केली; मात्र ते लवकरच पाठवले जातील, असे सांगितले. म्हणजे घोषणा झाली, आता तिचे धान्य प्रत्यक्ष रेशन दुकानापर्यंत पोहोचते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे! कारण दुष्काळात भाषणाने पोट भरत नाही; घरातील चुलीला धान्य लागते. गावकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रेशन वितरणाचे प्रश्नही मांडले. कमी पावसामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांनी दिलासा जाहीर केला. राज्यातील १८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान जमा केले जाणार आहे. मात्र, ही रक्कम तातडीने मिळणार नाही. कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतरच नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जून २०२६ मध्ये मंजूर झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभाची तरतूद आहे. २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीककर्ज घेऊन निर्धारित मुदतीत परतफेड केलेली असणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे आणि काही राजकीय पदाधिकारी यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे १८ लाखांचा आकडा सांगताना पात्रतेच्या अटी आणि प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रक्रिया विसरून चालणार नाही.

या दौऱ्यात शेतकऱ्यांनीही प्रश्नांचा पाऊस पाडला. पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला; त्याला मान्यता मिळाल्याचे आणि लवकरच काम सुरू होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. जगदीश देशमुख यांनी ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेला पाझर तलाव पूर्ण करण्याची मागणी केली. पाणी फाऊंडेशनचे युवा कार्यकर्ते जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाच्या कामाबद्दल आभार मानले. राजेंद्र चाफले आणि तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ व रानडुकरांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली. सौर कुंपणाला प्रतिसाद कमी असल्याने जंगलालगत कुंपण करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तालुकास्तरावर मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. आता प्रश्न एकच—घोषणांचे रूपांतर वेळेत अंमलबजावणीत होणार का? दुष्काळग्रस्तांना आश्वासनांची दिवाळी नको; धान्य, पाणी आणि खात्यात जमा होणारी मदत हवी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *