Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
१५ वर्षांचा निस्वार्थ प्रवास; रक्त, शिक्षण आणि माणुसकीचं देणं देणारे हात - Maharashtra 24

१५ वर्षांचा निस्वार्थ प्रवास; रक्त, शिक्षण आणि माणुसकीचं देणं देणारे हात

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | मंगेश खंडाळे | दि. ६ फेब्रुवारी २०२६ | | खरं सांगायचं तर “प्रयत्न सोशल ऑर्गनायजेशन” हे नाव अनेकांसाठी नवीन असू शकतं. तसं पाहिलं तर माझ्याही फार जवळच्या परिचयातील ही संस्था नव्हती. पण येता-जाता, वेगवेगळ्या लोकांकडून या संस्थेच्या कामाची कुजबुज कानावर पडत होती. “हे लोक वेगळं काहीतरी करतात” एवढंच तेव्हा माहित होतं. कुतूहल म्हणून एकदा नीट माहिती घ्यायचं ठरवलं… आणि समोर आलेली वास्तवाची चित्रं थक्क करणारी होती.

साधारण १५ वर्षांपूर्वी काही मित्रांनी मिळून, “समाजाचं आपल्यावर काहीतरी देणं लागतं” या साध्या पण प्रामाणिक भावनेतून प्रयत्नची सुरुवात केली. कुठली मोठी जाहिरात नाही, कुठला गाजावाजा नाही—फक्त काम. पहिलं पाऊल टाकलं ते रक्तदान शिबिरातून. आणि ते पाऊल आजही थांबलेलं नाही. सलग १५ वर्षे ही संस्था रक्तदान शिबिरं घेत आहे. वर्षभर गरजू, गंभीर (critical) रुग्णांसाठी रक्त, प्लेटलेट्सची तातडीने व्यवस्था करून देणं हे इथलं रोजचं कामच बनलं आहे. कोरोना महामारीच्या काळात, जेव्हा माणूस माणसापासून दूर होता, तेव्हा या संस्थेने २५० पेक्षा जास्त रुग्णांना प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, संस्थेतील प्रत्येक सदस्याने किमान ४० वेळा स्वतः रक्तदान केलं आहे. म्हणूनच महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही या कार्यासाठी प्रयत्नचं नाव आदरानं घेतलं जातं.

रक्तदानापुरतंच काम मर्यादित न ठेवता, “शिक्षण हीच खरी प्राथमिक गरज” हे धोरण स्वीकारून संस्थेने सामाजिक कामाची व्याप्ती वाढवली. आदिवासी पाडे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलं—ज्यांच्यासाठी शाळा गाठणंही संघर्ष असतो—त्यांना शालेय साहित्य, बाकडी, आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. आतापर्यंत किमान २५०० विद्यार्थ्यांना शिक्षण सोपं व्हावं म्हणून या संस्थेने हात दिला आहे. हा आकडा केवळ मोठा नाही, तर मनाला भिडणारा आहे.

दैनंदिन आयुष्याच्या धावपळीतून वेळ काढून, कोणतीही अपेक्षा न ठेवता, काही मित्रांनी सुरू केलेलं हे काम खरंच उल्लेखनीय आहे. म्हणूनच हा अनुभव शब्दांत मांडावा, हा लेख लिहावा असं मनापासून वाटलं. या सर्व मित्रांना असेच समाजासाठी काम करण्याचं बळ मिळो, आणि आपल्याला सगळ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळो—हीच सदिच्छा.

दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराज मंदिर, संत तुकाराम नगर येथे प्रयत्न संस्था रक्तदान शिबिराचं आयोजन करते. आणि विशेष म्हणजे, या उपक्रमाला दरवर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो—जो त्यांच्या कामाची खरी पावती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *