मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं भवितव्य कसं असेल?

Spread the love

महाराष्ट्र-24 -मुंबई:
मुंबई महापालिकेच्या वांद्रे पूर्व मधल्या रामकृष्ण परमहंस मार्ग शाळेत सकाळच्या अधिवेशातला मराठी दिनाचा कार्यक्रम सुरू होता. मराठी शाळा कमी होत आहेत, त्यातही महापालिकेच्या शाळांची स्थिती खालावतेय, अशी ओरड गेली अनेक वर्षं सुरू आहे. म्हणूनच एका मराठी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन तिथली परिस्थिती पाहिली. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाची वस्ती असणाऱ्या वांद्रे पूर्वच्या खेरवाडी भागातली ही शाळा.

 

महापालिकेच्या शाळा आणि पटसंख्या

मुंबई महापालिका एकूण 8 भाषांमध्ये शाळा चालवते. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तामिळ, तेलगू आणि कन्नड.
पटसंख्या कमी झाल्याने गेल्या 10 वर्षांत महापालिकेच्या अनेक शाळा बंद करण्यात आल्या.
प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या दहा वर्षांत – 2009-10 ते 2018-19 या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या एकूण 257 शाळा बंद करण्यात आल्या वा काही शाळा एकमेकांत विलीन करण्यात आल्या. यामध्ये 132 मराठी शाळा होत्या. तर गुजराती, तमिळ, तेलगू आणि कन्नड माध्यमांच्या मिळून एकूण 96 शाळा बंद करण्यात आल्या. वर्ष 2018-19मध्ये महापालिकेच्या 23 मराठी शाळा बंद करण्यात आल्या.

‘अमराठी पालकांची मुलं’
“अनेकदा आमच्याकडची मुलं या शाळांमध्ये जातात. आम्ही मुलांवर मेहनत घेतो, मूल चुणचुणीत झालं, त्याला बेसिक गोष्टी यायला लागल्या की त्याला ‘चांगल्या’ खासगी शाळेत टाकावं असं पालकांना वाटतं आणि ते मुलांची शाळा बदलतात. अनेकदा या खासगी शाळांकडून शिक्षकांवर दबाव असतो त्यांची पटसंख्या कायम ठेवण्याचा. म्हणून अनेकदा हे शिक्षकही पालकांना काही आश्वासनं देऊन आमच्या शाळेतली हुशार मुलं स्वतःच्या शाळेत नेतात. चौथीनंतर आणि सातवीनंतर मुलं शाळा बदलण्याची शक्यता असते. वेगवेगळी आमिषं देऊन आमची हुशार मुलं पळवली जातात,” संखे सांगतात.

गेल्या काही वर्षांमध्ये या शाळेची पटसंख्याही कमी झालेली आहे. पण तरीही शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचं प्रमाण इतर काही शाळांच्या तुलनेत चांगलं आहे. या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांपैकी 70 टक्के मुलं ही अमराठी कुटुंबातली आहेत. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, मुलांना मराठी भाषा लिहिता – बोलता आली तर त्यांना नोकरी मिळेल, असं पालकांना वाटत असल्याचं इथले शिक्षक सांगतात. पण घसरणारी पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांसोबतच प्रशासनानेही प्रयत्न करायला हवेत असंही शिक्षकांचं म्हणणं आहे.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी सांगितलं, “महापालिका यासाठीचे प्रयत्न करत आहे. शिक्षणातली गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. शाळा टापटीप असली की पालकांना आवडते. म्हणूनच त्यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *