गाडी विकल्यानंतर FASTag चं काय करायचं? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व कार आणि मोठ्या गाड्यांना ‘फास्टॅग’ (Fastag) लावणं बंधनकारक केलं आहे. ‘फास्टॅग’ हा एक प्रकारचा स्टिकर असून, तो वाहनांच्या समोरच्या बाजूस लावणं बंधनकारक आहे. चालकाला वाहनावरच्या या स्टिकरवर वापरण्यात आलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीच्या (RFID) साह्याने टोलचे पैसे भरण्यास मदत होते. यामुळे टोलभरणा सोपा आणि कमी वेळात होतो; मात्र ज्या गाडीवर ‘फास्टॅग’ स्टिकर लावला आहे. ती गाडी विकल्यानंतर फास्टॅगचं काय करायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की गाडी विकल्याची माहिती टॅग जारी करणाऱ्या बँकेला कळवावी लागते आणि फास्टॅगचं ते खातं बंद करावं लागतं.

‘फास्टॅग’च्या माध्यमातून ‘कॅशलेस’ म्हणजे रोख व्यवहार न करता टोल भरता येतो. फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागत नाही. टोलची रक्कम त्या व्यक्तीच्या फास्टॅगशी जोडलेल्या बँक खात्यामधून कापली जाते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो आणि टोलनाक्यांवरची गर्दी कमी होते.

प्रत्येक गाडीवरील ‘फास्टॅग’ मालकाच्या बँक खात्याशी जोडलेले असते. गाडी विकल्यानंतर ‘फास्टॅग’ निष्क्रिय अर्थात डिअॅक्टिव्हेट केला नाही, तर मूळ मालकाच्या खात्यातूनच टोलची रक्कम कापली जाते. त्यामुळे गाडी विकल्यानंतर त्यावरील ‘फास्टॅग’ ताबडतोब निष्क्रिय करणं गरजेचं आहे. तसंच मूळ मालकाने ‘फास्टॅग’ खातं बंद केले नाही, तर त्या गाडीच्या नव्या मालकाला नवीन ‘फास्टॅग’ मिळू शकणार नाही. कारण कोणत्याही वाहनाला फक्त एकच ‘फास्टॅग’ जोडला जाऊ शकतो. या संदर्भातली माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

‘फास्टॅग’ला लिंक केलेलं खातं किंवा ई-वॉलेट निष्क्रिय करण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर्सद्वारे वेगवेगळे मार्ग उपलब्ध केले जातात. यापैकी सर्वांत सोपा मार्ग म्हणजे कस्टमर सपोर्टमार्फत ‘फास्टॅग’ प्रोव्हायडरशी संपर्क साधणं आणि खातं निष्क्रिय करण्याची विनंती करणं. आपण तीन प्रकारे ‘फास्टॅग’ निष्क्रिय करू शकतो.

MoRTH/NHAI/IHMCL ने फास्टॅगशी संबंधित तक्रारींचं निराकरण करण्यासाठी 1033 हा हेल्पलाइन नंबर लाँच केला आहे. ग्राहक फास्टॅग संबंधित समस्यांसाठी या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

‘फास्टॅग’ जारी करून देणाऱ्या बँकेच्या मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये किंवा प्रीपेड वॉलेटमध्ये लॉग इन करावं आणि ‘फास्टॅग’ रद्द करण्यासाठी देण्यात आलेले पर्याय वापरावेत.

‘फास्टॅग’ जारी करणाऱ्या बँकेच्या ऑनलाइन पोर्टलवरदेखील तुम्ही लॉग इन करू शकता. पोर्टलवर ‘फास्टॅग’ खातं बंद करण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि ‘फास्टॅग’ निष्क्रिय करावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *