Monsoon Update | मान्सून वेळेआधीच अंदमानात; यंदा कशी असेल पावसाची स्थिती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१५ मे ।। अंदमानात यंदा मान्सूनच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अनुकूल स्थितीमुळे मान्सूनच्या वार्‍यांचा वेग वाढला आहे. तो 19 मेपूर्वीच अंदमानात, तर 1 जूनच्या आधी केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. अंदमानात यंदा सर्वप्रथम 13 मे रोजी रात्री उशिरा मान्सूनच्या हालचाली तयार होण्यास सुरुवात झाली. 14 मे रोजी या हालचालींना वेग आला. वार्‍यांचा वेग आणि योग्य दिशा तसेच हवेचे अनुकूल दाब आणि सध्या अंदमान आणि निकोबार बेटांवर पाच दिवस पडत असलेला पाऊस या स्थितीवरून मान्सूनची सक्रिय वर्दी हवामान विभागाने मंगळवारी अधिकृतपणे दिली.

त्यामुळे आता केरळमध्येदेखील मान्सून 31 मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता अधिक आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनचे वारे दक्षिण अंदमानातून वेगाने प्रगती करीत आहेत. या वार्‍यांचा वेग इतका आहे की, मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे 19 मेच्याही आधी दाखल होऊ शकतो. तसेच, निकोबार बेटांबरोबरच बंगालच्या उपसागरातील वायव्य दिशेला चक्रीय स्थिती तयार झाली आहे. यामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने होणार आहे.

मान्सून अंदमानात एक दिवस आधी म्हणजेच 18 मेपर्यंत, तर केरळात 31 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. कारण, यंदा खूप लवकर अनुकूल स्थिती प्राप्त झाल्यामुळे मान्सूनच्या वार्‍यांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे मान्सून वेळेआधीच अंदमान व केरळात दाखल होऊन महाराष्ट्रातदेखील वेळेआधीच येण्याची शक्यता आहे.

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *