केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नागरिकांना आवाहन ; ओमायक्रॉन हा सर्दीचा आजार नव्हे, दक्षता घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ जानेवारी । ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी, करोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग म्हणजे सर्दीचा आजार नव्हे, हे लक्षात घेऊन लोकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा करोना कृती गटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी दिला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून संसर्गदरही ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

देशात ३० डिसेंबर रोजी करोनाचा संसर्गदर १.१ टक्के होता, तो १२ जानेवारी रोजी ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाटय़ाने होऊ लागल्याचे स्पष्ट दिसते. जगभरात ओमायक्रॉनमुळे ११५ रुग्ण तर, भारतात एक रुग्ण दगावला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नये, असे पॉल म्हणाले. लसीची एकही मात्रा न घेतलेल्या अनेकांना करोनाचा संसर्ग होत असून त्यांना रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या ७८ टक्के लोकांमध्ये करोनासंसर्ग होण्याची शक्यता कमी होते. दोन्ही मात्रा घेतलेल्या ९०-९५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनी प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस घ्यावी, असेही पॉल म्हणाले.

१९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.

‘औषधांचा भडिमार करू नका!’ करोनाच्या दोन लाटेतील चुकांमधून नागरिकांनी आणि डॉक्टरांनी शिकवण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषधांचा भडिमार टाळा, असे पॉल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत कटाक्षाने सांगितले. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांवर ‘’रेमडेसिवीर’’चा अनावश्यक मारा केला गेला. स्टिरॉइडयुक्त औषधे दिल्यामुळे म्युकर मायकोसिससारखे गंभीर आजार बळावले होते. औषधांचा अतिमाराही घातक ठरू शकतो, या अनुभवातून आरोग्य सेवेनेही शहाणे होण्याची गरज आहे. घरगुती विलिनीकरणातील उपचारांमध्ये रेमडेसिवीरचा वापर करू नका. सौम्य लक्षणे असतील तर पॅरॅसिटेमॉलची गोळी घ्या, आयुष मंत्रालयाने सुचवलेले काढे घ्या, गरम पाणी प्या. पाच दिवसांनंतरही ताप-खोकला असेल तर कफ सीरप घ्या. प्राणवायूची गरज भासू लागली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हा, असेही पॉल यांनी सांगितले. करोनावर उपचार करताना कोणत्या औषधांचा वापर करावा, कोणत्या उपचार पद्धतीचा अवलंब करावा हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्लाझ्मा उपचारपद्धती बंद करण्यात आली आहे. मोलनुपिरावीर हे औषध करोनाच्या उपचारयादीतून काढून टाकण्यात आले आहे. वयोवृद्ध, सहव्याधीग्रस्त, गर्भवती महिलांना हे औषध देऊ नये, असेही पॉल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *