महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी थेट मावळात पिकू लागली आहे. मावळातील प्रयोगशील महिला शेतकरी (Farmer) वैशाली गायकवाड यांनी स्ट्रॉबेरीच (Strawberry) पीक मावळात (Maval) घेण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. आणि आता या प्रयोगाला यश येऊन बाजारपेठेत देखील स्थान मिळालं आहे.
पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळ तालुक्याला थंड हवेचे ठिकाणही म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे भाताचे आगार म्हणून देखील मावळ प्रसिद्ध आहे. इंद्रायणी भात शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मावळ तालुक्यात आता स्ट्रॉबेरी देखील येऊ लागली आहे. महाबळेश्वर मध्ये पिकणारी स्वीट सेन्सेशन नावाची स्ट्रॉबेरी प्रजाती आता मावळात देखील येऊ लागली आहे. मावळ मधील प्रयोगशील महिला शेतकरी वैशाली गायकवाड यांनी महाबळेश्वर येथून स्वीट सेन्सेशन या जातीची बीज आणली आणि ती रुजवली. आता एक एकरवर 48 हजार झाडे तयार करून स्ट्रॉबेरीच उत्पन्न घेतलं जातं आहे. तीनशे ते सातशे रुपये किलोने या स्ट्रॉबेरीची विक्री सध्या बाजारपेठेत केली जाते.
स्ट्रॉबेरीच हे उत्पन्न घेण्यासाठी वैशाली यांना केवळ तीन लाख रुपये खर्च आला. तर आता स्ट्रॉबेरी तयार होऊन बाजारपेठेत विक्री झाल्यावर त्यांना किमान सहा लाख रुपये नफा होण्याची अपेक्षा आहे. एक एकर मध्ये जमिनीत त्यांनी ट्रॅक्टरचा सह्याने जमीन सपाटीकरण केले गाडीवाफे तयार करून द्रिप च्या सहाय्याने पाण्याचं व्यवस्थापन केलं. गाडी वाफ्यावर मल्चिंग पेपर टाकून अडीच फुटावर बीज लावलं. एका रोपट्याला किमान एक किलो स्ट्रॉबेरी येत असल्याचे देखील गायकवाड सांगतात. मावळ मधील शेतकऱ्यांनी केवळ भात, ऊस या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता असे विविध प्रयोग करून उत्पन्न घ्यावे असे देखील आवाहन गायकवाड यांनी केले.
महिला आता प्रत्येक क्षेत्रात प्रगती करू लागल्या आहे. मात्र स्वतःला सुशिक्षित म्हणणारे शेती कडे दुर्लक्ष करीत आहे. पैसा कितीही कमावला तरी जगण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या मलावराच अवलंबून राहावे लागते. त्यात महिला शेतकरी पुढे येऊन आपल्या शेतात नवीन नवीन प्रयोग आपल्या शेतात करीत असेल तर नक्किच कौतुकास्पद आहे. चूल आणि मूल यात न अडकता महिला शेतकरीही शेती करून लाखो रुपये कमाऊ शकते हे वैशाली गायकवाड यांनी दाखऊन दिले आहे.