महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २७ फेब्रुवारी । उत्तर भारतात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा थंडी सुरु झाली आहे. दिल्लीत काल सकाळपर्यंत 10.1 मिमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, पुढच्या 24 तासात हवामान निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सूर्यप्रकाश देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या महिनाअखेरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत वातावरणात थोडीशी थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. शनिवारी दिल्लीत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती, मात्र दिवसभर पाऊस पडला नाही. मात्र, सायंकाळी अनेक भागात ढग दाटून आले होते.
महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात तापमानात चढ उतार सुरूच आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हळूहळू तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, दुसरीकडे, पावसामुळे शनिवारी दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ताही सुधारली आहे. दिल्लीचा AQI 102, फरिदाबादचा 97, गाझियाबादचा 101, ग्रेटर नोएडाचा 88, गुरुग्रामचा 128 आणि नोएडाचा 70 AQI आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे, दिल्लीत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला होता. आजपासून उत्तर प्रदेशातील हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ असेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज दिवसभर कडक सूर्यप्रकाश राहील आणि तापमानातही वाढ नोंदवली जाऊ शकते. कमाल तापमान पुन्हा एकदा 25 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. त्याचबरोबर पावसामुळे राज्यातील हवेची गुणवत्ता निश्चितच सुधारली आहे.