महाराष्ट्र २४; ऑनलाईन :पुणे – :राज्यात पहिले रुग्ण ९ मार्च रोजी पुण्यात आढळले. त्यांच्यावर वेळीच यशस्वी उपचार करण्यात आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना पुणे महापालिकेच्या डाँ. नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या दरम्यान, पहिल्या आठवड्यात राज्यात ३३ रुग्णांची नोंद झाली. यातील बहुतांश रुग्ण हे दुबई येथे सहलीसाठी गेलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील होते. पुण्यासह यवतमाळ, मुंबई, नागपूर येथील रुग्णांचा यात समावेश होता. दुस-या आठवड्यात रुग्णांची संख्या आठने वाढली. त्यात पिंपरी-चिंचवडसह औरंगाबाद, नगर या शहरांमधील रुग्णांची संख्या मोठी होती. तिस-या आठवड्यात मात्र, मुंबई आणि सांगली येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चार पटीने वाढली आहे. पहिल्या आठवड्यात ३३ रुग्ण आढळले होते. तिस-या आठवड्यात ही संख्या १३१ पर्यंत वाढल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली आहे.
राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग
कोरोना विषाणूंचा संसर्ग आता फक्त पुण्या-मुंबई शहरांपुरता मर्यादीत राहिलेला नाही. या विषाणूंचा निम्म्या महाराष्ट्रात फैलाव झाला आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुणे जिल्ह्यातही दोन रुग्ण आढळले आहेत. सांगली, ठाणे, नागपूर, यवतमाळ, नगर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ३६ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये या विषाणूंचा संसर्ग झाला आहे.
प्रवासी रुग्णांचे प्रमाण घटले
राज्यात पहिल्या आणि दुस-या आठवड्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा निदान होत होते. त्यापैकी परदेशातून आलेल्या लोकांच्या संपर्कातील रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती. पण, तिस-या आठवड्यात हे चित्र बदललेलं दिसत असल्याचं निरीक्षण आरोग्य खात्यातील अधिका-यांनी नोंदवलं. आता स्थानिक नागरिकांना संसर्ग झाल्याचे आढळत आहे. लाँकडाऊन केल्यानंतर हा बदल झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.