Pune: लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल पुढील वर्षीच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ मार्च । लोहगाव विमानतळावर उभारण्यात येत असलेल्या नवीन टर्मिनलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन, ते कार्यान्वित होण्यासाठी २०२३ सालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (एएआय) या कामासाठी ४७५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्याचे ५५ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. हे टर्मिनल ऑगस्ट २०२३पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, टर्मिनल इमारत ‘फोर स्टार’ दर्जाची असणार आहे.

लोहगाव विमानतळाचे सध्या टर्मिनल २२ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. या टर्मिनल इमारतीत वार्षिक सत्तर लाख प्रवासी क्षमता आहे. आता नव्याने उभारण्यात येत असलेले टर्मिनलचे क्षेत्र ४६ हजार ४५० चौरस मीटर आहे. हे दोन्ही टर्मिनल जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरी वाहतुकीसाठी ६९ हजार ६०० चौरस मीटरचे टर्मिनल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विमानतळावर होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीत (जुन्या इमारतीसह) १० पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, ७२ चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज हाताळणी यंत्रणा उपलब्ध असणार आहे. तर, ‘खानपान सेवा’ आणि किरकोळ वस्तूंच्या विक्रीसाठी ३६ हजार चौरस फूट जागेची तरतूद करण्यात आली आहे.

टर्मिनलचा बाहेरील बाजूचा दर्शनी भाग ३६० मीटरचा असणार आहे. त्यावर महाराष्ट्राच्या समृद्ध सामाजिक, ऐतिहासिक, कलात्मक संस्कृतीची कथा सांगणारी भित्तिचित्र असतील. टर्मिनलमधील व्हरांड्याच्या खालील सार्वजनिक क्षेत्राच्या दर्शनी भागाला ‘कमानी’ आणि स्थानिक गडद दगडांसह सजवलेले ‘स्तंभ’ साकारले जाणार आहेत. तसेच, नवीन टर्मिनलच्या प्रांगणातील उद्यानाची संरचना शनिवारवाड्यापासून प्रेरित होऊन केली आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोहगाव विमानतळासमोरील जागेवर बहुमजली वाहनतळाचे काम सुरू आहे. हे काम जुलै २०२२पर्यंत पूर्ण होऊन, ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या वाहनतळाची क्षमता १०२४ वाहनांची आहे. यामध्ये सरकते जिने आणि लिफ्टदेखील असणार आहे. ते टर्मिनल इमारतीशी जोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *